महायुतीने विधानसभेसाठी शंखनाद केला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख अजून जाहीर व्हायची आहे. पण वेळेवर कोणतीच गडबड नको आणि जागा वाटपावरुन नाराजी सत्र टाळण्यासाठी महाविकास आणि महायुती आटोकाट प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षात 125 जागांवर सहमतीची बातमी येऊन ठेपत नाही तोच, महायुतीत सुद्धा 100 जागांचा फॉर्म्युला ठरल्याचे समोर आले आहे. काय आहे अपडेट?
महाविकास आघाडीचं 125 जागांवर जमलं
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीची १२५ जागांवर सहमती झाल्याची माहिती दिली. काही जागांबाबत चर्चेअंती निर्णय होणार आहे. महाविकास आघाडीने लोकसभेतील चुका टाळण्यासाठी समन्वय ठेवला आहे. मात्र अजून त्यांनी जागा वाटपाची घोषणा केली नाही. राज्यात बंडखोरी कमी व्हावी आणि महायुतीतील दमदार बंडखोरांना खेम्यात ओढावे यासाठी वेट अँड वॉच तर करण्यात येत नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.
१०० जागा जाहीर करणार
येत्या पंधरवाड्यात महायुतीच्या १०० जागा जाहीर करण्याचं महायुतीचं लक्ष आहे. महायुतीकडून जागा वाटपाच्या फॅार्म्युल्यावर बैठकसत्र सुरूच राहणार आहे. मात्र ज्या जागांमुळे जागावाटपाच्या फॅार्म्युलावर काहीच अडचण येणार नाही अशा जागा जाहीर करण्यात येणार आहे. विद्यमान आमदार असणाऱ्या महायुतीच्या १०० जागा पितृ पंधरवाडा झाल्यावर लगेच जाहीर करण्यासाठी महायुतीची जोरदार तयारी सुरू आहे.
कोण आहे मोठा भाऊ
५० – २५ – २५ असा १०० जागांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये मोठा भाऊ अर्थातच भाजप असणार आहे. भाजपच्या ५० तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी २५ जागा असतील. जागा वाटपाचा निर्णय महिनाअखेर जाहीर करण्यावर महायुतीने भर दिला आहे. १०० जागा जाहीर होताच महायुतीचा प्रचाराचा प्रत्यक्ष धडाका सुरू होणार आहे. पहिल्या १०० जागांमध्ये कोणाकोणाचे नंबर लागणार याकडेही सर्वांचच लक्ष लागलं आहे. उमेदवाराला प्रचार प्रसारासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी भाजपनं हा पुढाकार घेतला आहे. यामुळे राज्यात आता निवडणुकीचे वातावरण तापायला सुरूवात झाल्याचे म्हणता येईल.