मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबरला पार पडणार आहे. दोन दिवसीय अधिवेशनासाठी दोन्ही सभागृहातील आमदारांची अँटिजन चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणाऱ्या आमदारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. (Vidhansabha Rainy Session MLAs to be tested for Corona)
सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळून पावसाळी अधिवेशन होणार आहे. शोक प्रस्ताव, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयकावर चर्चा होणार आहे. सात शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा यात समावेश आहे.
सुरक्षेविषयी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड-19 साठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. कोरोना चाचणी निगेटिव्ह येणाऱ्या आमदारांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल. सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) असलेल्या आमदारांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही आमदारांची बैठक व्यवस्था होणार आहे. प्रत्येक आमदाराला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर या वस्तूंचा समावेश असेल. आमदारांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. स्वीय सहायक, वाहनचालकांची बैठक व्यवस्था तंबूत केली जाणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर, तर विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
कामकाज सल्लागार समिती बैठकांना विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, ॲड. आशिष शेलार, अमिन पटेल, सुनील प्रभू, विधान परिषद सदस्य डॉ. रणजीत पाटील, अशोक ऊर्फ भाई जगताप, विजय ऊर्फ भाई गिरकर, जयंत पाटील, कपिल पाटील उपस्थित होते.
VIDEO : Maharashtra Assembly Session 2020 | विधीमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन 7 आणि 8 सप्टेंबरला होणारhttps://t.co/eC97jOt4HN #MaharashtraAssemblySession2020
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 25, 2020