मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षातील आमदारांना घेत सामील झाले होते. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याआधी अजित दादांकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद होतं, मात्र पवार सरकारमध्ये गेल्यावर या पदावर संख्याबळानुसार काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद गेलं होतं. पंरतु अधिवेशन सुरू झालं तरी काही काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं नव्हतं. अशातच काँग्रेसकडून विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदी ब्रम्हपुरी मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांच्यासोबत संग्राम थोपटे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांची नावे चर्चेत होतीत. मात्र काँग्रेस हायकमांडने विजय वडेट्टीवारांकडे ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पावसाळी अधिवेशनाला सुरूवाता झाली आहे मात्र तरीसुद्धा सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड झालेली नव्हती. विजय वडेट्टीवार यांच्याकडे दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली आहे. याआधी २०१९ मध्ये वडेट्टीवार यांच्याकडे हे पद देण्यात आलं होतं.
विजय वडेट्टीवार यांच्यावर हाय कमांडने विश्वास दाखवल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. काँग्रेस पक्षामध्ये माजी मुख्यंत्री अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आताचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ही जबाबदारी जाईल असं बोललं जात होतं. मात्र वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार ओबीसी नेते असून विदर्भामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अजित पवार यांच्या जाण्याने महाविकास आघाडीमध्ये मोठी पोकळी झाली होती. सभागृहात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठे नेते सरकारमध्ये असल्याने विरोधी पक्षालाही आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडणारा नेता हवा होता.