ठाकरे-चव्हाणांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं; आरक्षणासाठी 27 जून रोजी मुंबईत बाईक रॅली: मेटे

| Updated on: Jun 12, 2021 | 3:27 PM

मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) आम्ही गप्प बसणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञांच्या बैठका घेण्यात येईल. त्यानंतर जिल्हानिहाय मेळावे आणि मोर्चे काढण्यात येणार आहे. हे मेळावे मूक असणार नाहीत. तर बोलके असतील.

ठाकरे-चव्हाणांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं; आरक्षणासाठी 27 जून रोजी मुंबईत बाईक रॅली: मेटे
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम
Follow us on

पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी येत्या 27 जून रोजी मुंबईत दहा हजार मोटार सायकलींची रॅली काढण्यात येणार आहे, असं विनायक मेटे यांनी सांगितलं. (vinayak mete slams cm uddhav thackeray and ashok chavan over maratha reservation issue)

विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. 5 मे रोजी कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं. पण एक महिना उलटला तरी सरकारने अजून फेरविचार याचिका दाखल केली नाही. यापेक्षा निष्क्रियपणा दुसरा कोणता असू शकतो. आम्ही 5 तारखेपासून सांगतोय ते ऐकलं जात नाही. माजी न्यायामूर्ती भोसले यांच्या समितीने सांगितलेलं ऐकायचं नाही. याचाच अर्थ सरकारला मराठा आरक्षणाचं देणंघेणं राहिलेलं नाही. केवळ दिल्लीला जाऊन ठाकरे-चव्हाणांनी लोकांना वेड्यात काढलं आहे. दिल्ली भेटीत मराठा आरक्षणाचा विषय तोंडी लावायला होता. राज्यात मराठा समाजाचा रोष वाढल्यामुळे दिल्ली भेट झाली. काही तरी करतोय हे दाखवण्यासाठी ही भेट होती. प्रत्यक्षात मराठा समाजासाठी काहीच केलं नाही, असं मेटे म्हणाले.

कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार

मराठा आरक्षणासाठी आम्ही गप्प बसणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञांच्या बैठका घेण्यात येईल. त्यानंतर जिल्हानिहाय मेळावे आणि मोर्चे काढण्यात येणार आहे. हे मेळावे मूक असणार नाहीत. तर बोलके असतील. न्याय मागणारे असतील. संघर्ष करणारे असतील, असं सांगतानाच भोसले कमिटीप्रमाणेच आम्ही कायदे तज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहोत. समाजाच्यावतीने ही समिती नेमली जाईल. येत्या आठ दिवसात या समितीची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

अधिवेशन चालू देणार नाही

मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या पाहिजेत. मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन चालू देणार नाही, असं सांगतानाच येत्या 27 जून रोजी मुंबईत दहा हजार मोटारसायकलची रॅली काढण्यात येणार आहे. मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी ही बाईक रॅली काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यव्यापी दौरा

मराठा आरक्षणासंदर्भात समाजाची जनजागृती करण्यासाठी पुण्यातून राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करण्यात येणार आहे. पुण्यातून नगर नंतर उद्या औरंगाबाद, जालना, सोलापूरमध्ये जाऊ. दुसऱ्या टप्प्यात रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणी जाणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा, मेळावा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अशोक चव्हाण नाकर्ते

मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाबद्दल आस्था नाही म्हणून त्यांनी अजून मराठा समाजाची बैठकही बोलावली नाही. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यात काही आडकाठी आहे का? असेल तर मुख्यमंत्र्यांनी तसे जाहीर करावं, असं आवाहन त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी भवन किंवा मराठा भवन प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावं, त्यात सारथीचे उपकेंद्र असले पाहिजे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे केंद्रही असले पाहिजे, असं सांगतानाच हे सरकार मराठा समाजातील काही लोकांचा वापर करत आहे. अशोक चव्हाण नाकर्ते आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. (vinayak mete slams cm uddhav thackeray and ashok chavan over maratha reservation issue)

 

संबंधित बातम्या:

“अजित पवारांसोबत आम्ही सरकार स्थापन केलं, त्यावेळी जेव्हढी ताकद लावली, ती आता का नाही?”

संभाजीराजे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजप खासदार: चंद्रकांत पाटील

15 वर्षीय राज पांडेचं अपहरण करुन हत्या, राजने गायलेल्या ‘आयेगी मेरी याद’ गाण्याने नागपूरकरांच्या डोळ्यात पाणी

(vinayak mete slams cm uddhav thackeray and ashok chavan over maratha reservation issue)