रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजकारण पुन्हा तापले आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे सेनेचे विनायक राऊत यांचा पराभव केला होता. मतदान प्रक्रियेवर त्यावेळी ठाकरे गटाने मोठा आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगावर पण आगपाखड केली होती. खासदार नारायण राणे यांच्या विजयाला आव्हान देण्याचे संकेत ठाकरे गटाने दिले होते. राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.
राऊतांची हायकोर्टात धाव
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी या निवडणुकीत मते विकत घेतली. त्यांनी मतदारांना धमकावले आणि विजय मिळवल्याचा आरोप शिवसेना नेते विनायक राऊतांनी केला होता. आता त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.
काय आहेत याचिकेत आरोप?
1. नारायण राणे यांनी मते विकत घेतली. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
2. नारायण राणे, त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले.
3. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई करण्याची तसदी पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नाही.
4. आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला हरताळ फासला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
5. प्रचारात मतदारांना धमकी तसेच पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याआधारे चौकशी करावी. त्यांची खासदारकी रद्द करावी.
6. याचिकेत नारायण राणे, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे.
7. 7 मे रोजी झालेली लोकसभा निवडणूक आणि 4 जून रोजीचा निकाल अवैध आहे, असे घोषीत करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
8. राणे यांनी मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.
9. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.