मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शुभेच्या देण्यासाठी येत आहेत, असे शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर यावेळी त्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा तर येत आहेतच. सोबतच बंडखोरीच्या या राजकीय वातावरणात त्यांना आधार देण्यासाठी अनेक शिवसैनिक (Shivsainik) येत आहेत. आपल्याला लढायचे आहे, जिंकायचे आहे, असा आधार प्रत्येकजण देत आहे. त्यामुळे अभिमान वाटत आहे, असे विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले. मुख्यमंत्री आणि शिवसेना बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्यात. मात्र यावेळी त्यांनी केवळ माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….अशा आशयाचे ट्विट एकनाथ शिंदे यांनी करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. तर माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो! असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र दोघांनीही उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असा उल्लेख केला नाही. त्यावर विनायक राऊत यांनी टीका केली.
एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नाही. अशा शुभेच्छांना आम्ही फार काही किंमत देत नाही. त्यांनी पक्षप्रमुख म्हटले पाहिजे, असे काही नाही. त्यांची जागा काय आहे, हे आता येत्या काही दिवसांत नक्की ठरेल, असा टोला बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंना लगावला आहे. ओमराजे निंबाळकर, नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेकांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान, शिवसेनेतील बंडखोर नेत्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.