मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी (shivsainik) हल्ला केला होता. यावेळी आपल्या हनुवटीला मार लागल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. या दाव्यावरून शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सोमय्यांना चांगलेच घेरले आहे. काल हनुवटीला लागलं होतं. आज हनुवटी गुळगुळीत आहे, असा चिमटा काढतानाच किरीट सोमय्याने राणा दाम्पत्याचं पालकत्व घेतले का? न्यायालयाने काय सांगितलं माहिती आहे ना? न्यायालयाने दोन्ही एफआयआर योग्य असल्याचं म्हटलं असून राणा दाम्पत्यावर ताशेरे ओढले आहेत, असं राऊत म्हणाले. किरीट सोमय्या राज्यपालांना भेटणार आहेत. त्यांचं दुकान नेहमीच उघड असतं. राज्यातले सरकार अस्थिर करावं आणि राष्ट्रपती राजवट लावावी यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. राजकारण करताना तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात हे पाप आहे. भाजप हे सर्व करत आहे, अशी टीका विनायक राऊत (vinayak raut) यांनी केली.
विनायक राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हा टोला लगावला. भाजपची सत्ता असलेल्या त्रिपुरात काँग्रेसच्या महिला खासदारावर तुम्ही कशा पद्धतीने अन्याय-अत्याचार केलात सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रपती राजवट लावायला काय केलं आहे आम्ही? 17 बलात्कार यूपीमध्ये झाले. हाथरस, उन्नावच्या घटना घडल्या. पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत जाळून टाकलं. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलांनं शेतकर्यांच्या अंगावर गाडी घातली. तिथे राष्ट्रपती राजवट लावली का? असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कुठेही महिलांच्या संदर्भात अवमानकारक वागणूक देणार नाही. यासंदर्भात बोलणं किळसवाणं वाटतं. ज्यांचं आयुष्य खोट्यावर उभं आहे, त्या निवडणुकीत उभा राहिल्या खोट्या जात सर्टिफिकेटवर त्यांचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी व्हिडिओ शेअर करून सिद्ध केलं की त्यांना कशा पद्धतीची वागणूक दिलीय. यावर पळवाट काढण्यासाठी जातीच्या नावाने भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं ते म्हणाले. लोकप्रतिनिधींना कुठल्याही पद्धतीची अटक झाली तर लोकसभा कामकाज समितीत यासंदर्भातला अहवाल मागून घेतला जातो. संविधानावर विश्वास असेल तर विशेष पूर्ण अहवाल मागून घेण्याची गरज नाही. पोलीस तसा अहवाल देतातच. या सर्वांच्या मागे कोण आहे हे तुम्हाला माहीतच आहे म्हणून नाटक सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
भारतीय कामगार सेना 1 मेला महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे. बेरोजगार, महागाई असंघटित कामगार यांच्यासाठी हे आंदोलन होणार आहे. केंद्र सरकारने कामगार विरोधी कायदे आणले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर आंदोलन केलं जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.