विरार : विरारमध्ये वयोवृद्ध महिलेची राहत्या घरी हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 63 वर्षीय मनिषा डोंबल यांची छातीत चाकू भोसकून हत्या करण्यात आली. घरातील रोकड आणि सोनं गायब झाल्याने चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक संशय (Virar Old Lady Murder) आहे.
विरार पश्चिम भागातील विराटनगरमधील ‘ग्रीष्मा पॅलेस’ सोसायटीच्या तळ मजल्यावर हा प्रकार घडला. शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा ते सात वाजताच्या सुमारास ही घटना उघड झाली.
15 वर्षांपासून रेल्वेत पाकिटमारी करुन कोट्यधीश, ‘थानेदार’ची संपत्ती…
घरात मनिषा डोंबल एकट्याच असताना चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. त्यांच्या छातीत चाकू खुपसून घरातील रोकड आणि सोनं घेऊन चोरटे पसार झाले आहेत.
63 वर्षीय मनिषा डोंबल पती मनोहर डोंबल यांच्यासह विरारमध्ये राहत होत्या. पुतणी खुशी दिलीप डोंबल आणि पती मनोहर हे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घरी आले, तेव्हा मनिषा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्या. त्यांनी तात्काळ विरार पोलिसांना याची माहिती दिली.
मनोहर डोंबल ‘ओबेरॉय हॉटेल’मध्ये काम करत होते. निवृत्तीनंतर ते मुंबईत पार्ट टाईम जॉब करतात. मनिषा गृहिणी होत्या, तर त्यांच्या सोबत राहणारी पुतणी खुशी कॉलेजला जाते.
सध्या पोलिस आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासत आहेत. एक विशेष टीम या घटनेच्या तपासासाठी तयार करण्यात आली आहे. मात्र या निमित्ताने वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर (Virar Old Lady Murder) आला आहे.