विरार : वसई विरार महापालिका निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि गटारीच्या निमित्ताने विरारमधील शिवसैनिकांनी भन्नाट शक्कल लढवली आहे. खवय्यांना चक्क अल्प दरात चिकन देण्याचे आमिष दाखवण्यात आले आहे. मांसाहाराच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर चिकन प्रति किलो 180 रुपयांना मिळणार आहे.
चिकन प्रति किलो 180 रुपये
विरार पूर्व भागातील साईनाथ नगर येथील शिवसैनिकांनी अल्प दरात एक किलो चिकन विक्रीची घोषणा केली आहे. सध्या चिकनचे दर प्रति किलो 230 ते 240 रुपयांवर पोहोचले आहेत. श्रावण अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे अनेकांना गटारीचे वेध लागले आहेत. त्यामुळे मांसाहाराच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी हेच चिकन प्रति किलो 180 रुपयांना देणार, असे फलक लावून जाहिरात केली आहे. प्रत्येकाला एकच किलो चिकन मिळेल. या फलकावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे फोटोही टाकण्यात आले आहेत.
आगाऊ नोंदणी आवश्यक
रविवारी गटारी अमावस्या आहे. तळीरामांसोबतच मांसाहारी खवय्यांचे डोळेही या दिवसाकडे लागलेले असतात. तीच संधी साधून शिवसैनिकांनी ही शक्कल लढवली असल्याचे समोर आले आहे. रविवारी 8 ऑगस्टला विरार पूर्व साईनाथ नगर नाका येथे सकाळी 9 ते 11 या वेळेत हे चिकन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. महिला आघाडीच्या सौ रुचिता चेतन रुके यांनी हे आयोजन केले आहे.
कोकणात झालेल्या पूर परिस्थितीवर संपूर्ण राज्य चिंताग्रस्त झाले आहे. अनेक जण मदतीसाठी पुढे येत असताना विरारमधील शिवसैनिक मात्र अल्प दरात चिकनची जाहिरात करत असल्याने परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
संबंधित बातम्या :
Chicken Price Hike: आता चिकनही महागलं, किती दर वाढले? ग्रामीण भागात मोठी मागणी
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ड्रायफ्रुट्स, मासे, चिकन, सोयाबीन आणि पनीर खाणे फायदेशीर !