नंदुरबारमधील या गावात बॅलेट पेपरवर मतदान; लाडक्या बहि‍णींची तुफान गर्दी, गावकऱ्यांची मागणी तरी काय?

| Updated on: Dec 08, 2024 | 11:30 AM

Ballot Paper Voting : सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे ईव्हीएमविरोधात आंदोलन पेटले आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी ग्रामस्थ आग्रही आहेत. शरद पवार येथे ठाण मांडून बसले आहेत. तर दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातील या गावात बॅलेट पेपरवर मतदान सुरु झाले आहे...

नंदुरबारमधील या गावात बॅलेट पेपरवर मतदान; लाडक्या बहि‍णींची तुफान गर्दी, गावकऱ्यांची मागणी तरी काय?
नंदुरबारमध्ये बॅलेट पेपरवर मतदान
Follow us on

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात ईव्हीएमविरोधात आंदोलन पेटले आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. ईव्हीएमविरोधातील आंदोलनात हे गाव देशाचं केंद्रबिंदु ठरण्याची शक्यता आहे. शरद पवार या गावात दाखल झाले आहेत. तर राहुल गांधी ईव्हीएमविरोधातील आंदोलनाचा श्रीगणेशा याच गावातून करणार असल्याचे समोर येत आहे. उद्धव ठाकरे पण मारकडवाडीत जाणार आहेत. पण त्यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील या गावात बॅलेट पेपरवर मतदानाला सुरुवात झाली आहे. पण कशासाठी होत आहे हे मतदान?

दारुबंदीसाठी महिलांचे मतदान

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यामधील असलोद येथे दारूबंदीसाठी महिलांनी मतदान केल आहे. सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. गावातील १२६० महिला मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदान केंद्रांवर मतदानासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा दिसत आहे. लाडक्या बहिणी या दारुबंदीसाठी समोर आल्या आहेत. त्यांनी मोठ्या संख्यने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

मतदानावेळी अनुचीत प्रकार घडू नये यासाठी गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी असलोद गावात दाखल झाले आहेत. दारूमुळे गावातील तरुण पिढीवर परिणाम होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलांनी सुरू केलेल्या लढ्याला यश येणार का? हे मतमोजणी नंतर समोर येईल.

अवैध दारुची विक्री

नंदुरबार हा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमावर्ती भागातील जिल्हा आहे. गुजरातमध्ये दारुबंदी असल्याने नंदुरबार येथील सीमावर्ती भागातून गुजरातमध्ये चोरट्या पद्धतीने दारु विक्री करण्यात येते. अवैध दारू पाडण्याचे काम सुद्धा या भागात मोठ्या प्रमाणात होते. गेल्या पाच वर्षांपासून असलोद गावकरी अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडे दाद मागत आहेत. आता या गावात संपूर्ण दारुबंदी करण्यासाठी महिलांनी मतदान प्रक्रियेत हिरारीने सहभाग घेतला आहे. या गावात दारुबंदी करण्याची मागणी महिलांनी केली आहे. त्यांच्या लढ्याला किती यश मिळते हे लवकरच समोर येईल.