मुंबई : अत्यंत जुनं आणि लहान मुलांचं स्पेशलिस्ट असलेलं वाडिया रुग्णालय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे (Wadia Hospital). मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाकडून वाडिया रुग्णालयासाठी दिला जाणारा निधी अनेक वर्षांपासून थकित आहे, त्यामुळे वाडिया रुग्णालयाचा कारभार ढबघाईस आला आला आहे.
वाडिया लहान मुलांचे रुग्णालय हे एक मोठं आणि विश्वसनीय नाव आहे. मात्र, दीड वर्षांपासून वाडिया रुग्णालयाला मिळणारा आर्थिक निधी थकित आहे. रुगणालयाची जवळपास 230 कोटींचं अनुदान थकित आहे, ज्यामुळे वाडिया रुग्णालयाचा कारभार चालणं आता अवघड होऊन बसलं आहे. परिणामस्वरूप हे रुग्णालय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. रुग्णालय प्रशासनातर्फे ही सर्व माहिती नोटिसच्या माध्यामतून रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना दिली जात असून काही रुग्णांना अर्धवट उपचारकरुन सुट्टी दिली जात असल्याचीही माहिती आहे.
वाडियाची दोन रुग्णालयं, वाडिया मेटरनिटी आणि वाडिया चिल्ड्रेन, या दोन्ही रुग्णालयांमध्ये एकूण 250 पेक्षा अधिक डॉक्टरांची टीम काम करत आहे. तर 1500 पेक्षा अधिक कर्मचारी येथे कार्यकरत आहेत. लालबावटा, जनरल कामगार युनियन तर्फे वाडिया रुग्णालयाच्या समस्या सोडवण्यासाठी सोमवारपासून निदर्शनं करण्यात येणार आहेत.
वाडिया रुग्णालय हे ट्रस्ट मार्फत संचालित केलं जातं. त्यात ट्रस्ट, मनपा आणि राज्य सरकार या तिघांच्या निधीतून रुग्णालयाचा कार्यभार चालतो. पण गेल्या काही वर्षांपासून मनपा आणि राज्य सरकारकडून रुग्णालयाला मिळणारा निधी थकित आहे. म्हणून रुग्णालय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. मनपा आणि राज्य सरकार रुग्णालय प्रश्सनाला थकित निधि कधी देणार, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
“वाडिया रुग्णालयाला 90 वर्षांची परंपरा आहे. 830 बेडच्या या रुग्णालयात 525 बाल रुग्णालयातील बेड, तर 305 प्रसुती रुग्णालयातील बेड आहेत. बाई जेरबाई वाडिया बाल रूग्णालयाला महापालिकेचे अनुदान तर, नौरोसजी वाडियाला पालिका आणि राज्य सरकार अनुदान देते. गेल्या दीड वर्षांपासून हे अनुदान थकित आहे. जवळपास 229 कोटी निधी राज्यशासनाकडून आणि महापालिकेकडून थकित आहे. रुग्णालयात औषधांचा साठाही संपला आहे. निधी नसल्याने रुग्णसेवा पुरवणे कठीण झालं आहे. त्यामुळे 50% बेड सध्या कमी केले आहेत. केवळ आपत्कालीन सेवा सुरु आहे. हे रुग्णालय चांगलं आहे, सरकारने याला अनुदान दिलं पाहिजे, अशी मागणी आता रुग्णाच्या नातेवाईक करत आहेत”, अशी माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉ. शकुंतला प्रभु यांनी दिली.