WATER CUT : मुंबईकरांवर दोन दिवस पाणी कपातीचे संकट, कोणत्या विभागात पूर्ण पाणी बंद? घ्या जाणून

| Updated on: Jan 26, 2023 | 6:03 PM

मुंबईला पाणीपुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी बारा विभागात पाणी बंद तर दोन विभागात पाणी कपात करण्यात येणार आहे. नवीन दुरुस्ती कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवणार आहे.

WATER CUT : मुंबईकरांवर दोन दिवस पाणी कपातीचे संकट, कोणत्या विभागात पूर्ण पाणी बंद? घ्या जाणून
WATER MARK
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता आणि पाणीपुरवठा प्रकल्प या दोन खात्याद्वारे भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४ हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणे, विविध जल वाहिन्यांवर झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी यासोबतच अन्य २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे अशी कामे हाती घेतली जाणार आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अधिक सुरळीतपणे आणि चांगल्या पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा यासाठी ही कामे हाती घेतली जात आहेत. यामुळे २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या दरम्यान महानगरपालिकेच्या बारा विभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

मुंबईतील १२ विभागात ३० जानेवारी सकाळी १० ते ३१ जानेवारी सकाळी १० पर्यंत महानगरपालिकेच्या २४ विभागांपैकी १२ विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. तर, दोन विभागात २५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व, एच पश्चिम आणि पूर्व उपनगरातील एस, एन आणि एल विभाग अशा १२ विभागातील अनेक परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

३० व ३१ जानेवारी २०२३ रोजी ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या २ विभागातील प्रभादेवी, माहीम, दादर आणि माटुंगा ( पश्चिम ) परिसरातील पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात केली जाणार आहे. धारावी परिसरातही जेथे दुपारी ४ ते सायंकाळी ९ दरम्यान पाणीपुरवठा होणाऱ्या भागात ३० जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.