मुंबई: अर्धा जून (June) महिना संपून गेला तरी पावसाचा पत्ता नसल्याने मुंबईवर (Mumbai) पाणीकपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील आठवडाभर पावसाने (Rain) दडी मारल्यास तलावांत उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन 10 ते 15 टक्क्यांपर्यंत पाणीकपात होण्याची शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सात तलांवात फक्त 11 टक्के पाणी शिल्लक आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात तलावातील पाण्याची पातळी समाधानकारक असताना आता मात्र तीन वर्षांतील आजच्या दिवसाची सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत तलावांत 160831 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक असून तो पुढील ४२ दिवसांना पुरणारा आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास आठवडाभरानंतर उपलब्ध पाणीसाठा पाहून पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मोडकसागर – 48375 दशलक्ष लिटर
तानसा – 6088 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा- 23729 दशलक्ष लिटर
भातसा – 76788 दशलक्ष लिटर
विहार – 3715 दशलक्ष लिटर
तुलसी – 2164 दशलक्ष लिटर
आठवडाभर वाट पाहून पालिका निर्णय घेणार आहे.
2022- 160831 दशलक्ष लिटर (11 टक्के)
2021 – 186719 दशलक्ष लिटर (12.90 टक्के)
2020- 1674343 दशलक्ष लिटर (११.५७ टक्के)