मुंबई : बहुमत चाचणीत आमचाच विजय होणार, असा विश्वास शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला आहे. आसाममधील गुवाहाटी याठिकाणी असलेल्या कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यानंतर त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. कोणालाही जबरदस्ती केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. तंत्र, मंत्राच्या सहाय्याने विजय प्राप्त करण्यासाठी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर इच्छा पूर्ण होतात, अशी अख्यायिका आहे. आता या सर्व बंडखोरांना यश मिळणार का, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान आम्ही सर्वांनी कामाख्या देवीचे (Kamakhya Temple) दर्शन घेतले आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे. श्रद्धापूर्वक आम्ही माँ कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. सर्व आमदार मोकळेपणाने याठिकाणी फिरत आहेत. कोणालाही जबदरस्ती केलेली तुम्ही पाहिली का, असा सवाल त्यांनी विचारला. उद्या आम्ही सर्व आमदार (Rebel MLAs) मुंबईत पोहोचणार आहोत, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
गुवाहाटीतील कामाख्या देवीचे मंदिर असे ठिकाण आहे, ज्याठिकाणी निवडणुकीतील विजय आणि आशीर्वाद मिळतात, अशी श्रद्धा आहे. तंत्र-मंत्राचे महापीठ मानले जाणारे कामाख्या पीठ सिद्ध स्थान मानले जाते. त्यामुळे राजकीय नेत्यांची याठिकाणी दर्शनासाठी गर्दी नेहमीच होत असते. आता महाराष्ट्रातील नेत्यांनीही कामाख्या देवीसमोर डोके ठेवत आशीर्वाद मागितले आहेत. तसेच पूरग्रस्तांसाठीही साकडे घालत हे संकट दूर व्हावे, म्हणून प्रार्थना केली.
देवीच्या दर्शनानंतर ते म्हणाले, आमच्याकडे 40 अधिक 10 असे 50 लोक आहेत. म्हणजेच 50 आमदार आमच्यासोबत असून आम्ही बहुमतात आहोत. दोन तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत आमच्या गटाकडे आहे. त्यामुळे विधानभवनातील बहुमत चाचणीची आम्हाला काहीही चिंता नाही. जी कोणती परीक्षा असेल, त्यात आम्ही पूर्णपणे पास होऊ. आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. लोकशाहीत आकडे आणि बहुमताला विशेष महत्त्व आहे. या देशात घटना, कायदे आणि नियम यापुढे कोणालाही जाता येणार नाही, असे ते म्हणाले.
मुंबईला पोहोचल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणार. शिवाय धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनीही वंदन करणार, असे सांगतानाच ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. ही हिंदुत्त्वाला पुढे नेणारी शिवसेना आहे. ही धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांना पुढे नेणारी शिवसेना आहे. या राज्यातील जनतेला सुखी, समृद्धी, समाधानी ठेवण्यासाठी, राज्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी, राज्याचा विकास करण्यासाठी, राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना प्रयत्न करीत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी आसाममधील जनतेचे आभार मानले आहेत. यावेळी शिंदे गटातील आमदारांनी आसाममधील पूरग्रस्तांना मदत केल्याची माहितीही त्यांनी दिली.