मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांसह आरोग्य सुविधांवरील ताण वाढतो आहे. अनेक भागातून रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक झाली. यात राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतानाच लॉकडाऊनच्या आवश्यकतेवरही चर्चा झाली. यावेळी टास्क फोर्सने राज्यातील कोरोना नियंत्रणावर उपाययोजना सुचवताना महत्त्वाच्या सूचना केल्यात. यात त्यांनी राज्यातील डॉक्टरांना कोरोना रुग्णांची 6 मिनिटे वॉक टेस्ट घेण्याचीही सूचना केलीय. जाणून घेऊयात काय आहे ही 6 मिनिटांची वॉक टेस्ट (What is 6 Minutes Walk test to check risk of Covid 19 corona infection).
टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत म्हटलं आहे, “95 टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात. केवळ गंभीर स्वरुपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते. त्यादृष्टीने जनजागृती करावी. सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तिथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी. मुंबई पालिकेसारखी वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून बेड्सचे उत्तम व्यवस्थापन करावे, डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला 6 मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी, मगच निर्णय घ्यावेत.”
टास्क फोर्सकडून महत्त्वाच्या सूचना
तरुण रुग्णांना देखील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे, त्याचे नियोजन करावे. ऑक्सिजन देताना तो योग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे यासाठी डॉक्टर्सना सूचना देणे, मास्क न लावल्यास किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारणे, एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा, आयुष डॉक्टर्सचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेणे आदी सूचना टास्क फोर्सने या बैठकीत केल्या आहेत.
कोरोनामुळे त्रास होण्याची भिती वाटतेय, मग हे कराच…
ज्यांना आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊन प्रकृती बिघडण्याची शंका मनात आहे त्या सर्वांसाठी 6 मिनिटांची वॉक टेस्ट चांगला पर्याय असल्याचं मत जाणकार व्यक्त करत आहेत. या टेस्टमुळे संबंधित व्यक्तीला आपल्या शरीरातील रक्ताच्या ऑक्सिजनच्या पातळीचा एक अंदाज घेता येऊ शकतो. तसेच हर्ट रेटही मोजता येतो. आपल्या रुम किंवा घरात चालण्याची जागा आहे तेथे 6 मिनिटे चालल्यानंतर हर्ट रेट आणि रक्तातील ऑक्सिजन दोन्हींची पातळी बदलते. यावरुनच डॉक्टरांना काही निरीक्षणं करत कोरोनाचा अंदाज बांधता येऊ शकतो.
6 मिनिटांची वॉक टेस्ट कशी कराल?
1. संबंधित रुग्णाने मास्क घालावा किंवा तोंडाला रुमाल बांधावा.
2. ही चाचणी करणाऱ्याची रक्तातील ऑक्सिजनची पातळी 94 टक्क्यांपेक्षा अधिक असावी. त्या व्यक्तिला धापा लागण्याचा त्रास नसावा आणि कोणताही आधार न घेता चालता यावं.
3. संबंधित व्यक्तिला रुम किंवा हॉलमध्ये न थांबता 6 मिनिटं चालता यावं.
4. 6 मिनिटे चालल्यानंतर पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने संबंधित व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासावं.
निष्कर्ष :
6 मिनिटे चालल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी 93 टक्क्यांच्या खाली गेली नसेल तर त्या व्यक्तीची प्रकृती चांगली असल्याचं मानलं जातं. जर त्या व्यक्तीच्या ऑक्सिजन पातळीत चालल्यानंतर 3 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली तर डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीला दाखल करुन घ्यावं. कारण या व्यक्तीला कोरोना संसर्गानंतर शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचा त्रास जाणवू शकतो, असं मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळेच अशा व्यक्तींना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
हेही वाचा :
Corona Vaccine : भारताला ‘या’ आणखी 5 कोरोना लसी मिळणार, लसींचा तुटवडा संपणार?
Remdesivir Injection | भारत सरकारनं रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवली, मोदी सरकारचा मोठा निर्णय
रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, पुण्यात नामांकित हॉस्पिटलच्या नर्सला बेड्या, मित्रालाही अटक
व्हिडीओ पाहा :
What is 6 Minutes Walk test to check risk of Covid 19 corona infection