मुंबई : खतं खरेदी करण्यासाठीही आता शेतकऱ्यांना जात विचारली जातेय. केंद्राच्या नव्या सॉफ्टवेअरमध्ये जात टाकली नाही, की खतच मिळत नाहीय. त्यावरुन शेतकऱ्यांनीही संताप व्यक्त केला. तर विरोधकांनीही अधिवेशनात सरकारला घेरलंय.
खतासाठी जात सांगण्याची सक्ती शेतकऱ्यावर आली आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तर विधानसभेतही विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं. आता खतासाठी जात सांगण्याची भानगड काय तेही पाहुयात.
केंद्रामार्फत खत खरेदीसाठी काही वर्षांपासून ई पॉस मशिन कार्यरत आहे. नुकतंच या ई पॉस मशिनचं सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आलंय. मात्र आता शेतकरी जेव्हा दुकानात खत खरेदीसाठी जातो तेव्हा त्याला नाव, मोबाईल नंबर, पोत्यांची संख्येसह जातही विचारली जातेय. जात टाकली नाही तर खत मिळत नाहीय
हे झालं विधानसभेतलं, पण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना यावर विचारलं तर, दानवे पत्रकारावरच भडकले. खतासाठी कुठं जात विचारत असते का ?हेच तर दानवेजी, शेतकरीही विचारतोय. पण अन्नदात्या शेतकऱ्याला जात विचारली जात असल्यानं संतापाचा कडेलोट झाला. आता केंद्राला सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यास विनंती करणार असल्याचं राज्य सरकारनं सांगितलंय. त्यामुळं ई पॉस मशिनमधून जातीचा कॉलम हद्दपार होईल अशी अपेक्षा.