मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळीच्या इर्स्टन एक्सप्रेस हायवेला जोडणाऱ्या मेट्रो – 6 चे बांधकाम 66 टक्के पूर्ण झाल्याचे एमएमआरडीएने जाहीर केले आहे. या मेट्रो मार्गिकेमुळे पश्चिम उपनगराला पूर्व उपनगराशी जोडता येणार आहे. 15.31 किमी लांबीच्या या मार्गिकेचे वायडक्टचे काम 71 टक्के पूर्ण झाले आहे. तर एकूण फिजिकल कंस्ट्रक्शन 66 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र मेट्रो सहाचे कारशेड नेमके कुठे बांधणार आहे ? ते केंद्राने आधीच्या सरकारला जमिन देण्यास नकार दिलेल्या कांजूरमार्ग मिठागराच्या जमिनीवर बांधणार की आणखीन कुठे हे सरकारने स्पष्ठ केलेले नाही. त्यामुळे हा प्रकल्प आणखीन रखडणार असल्याचे म्हटले जात आहे.
एमएमआरडीए अंधेरी पश्चिमेकडील स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी ( ईर्स्टन एक्सप्रेस हायवे ) हा 15.31 किमीचा मार्ग जोगेश्वरी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि पवई येथून जाणार आहे. या मार्गिकेचा महत्वाचा भाग जेव्हीएलआर मधून जाणार असून संपूर्ण एलिवेटेड असलेल्या या मार्गामुळे पश्चिम उपनगराची पूर्व उपनगराशी कनेक्शन होणार आहे. त्याशिवाय मुंबईचा उत्तर – दक्षिण आणि पूर्व – पश्चिम भाग जोडला जाणार आहे. ही मार्गिका सरकारी कार्यालये, व्यावसायिक केंद्रे, तसेच अन्य व्यापारी केंद्राला जोडली जाणार आहे.
अनेक मेट्रो मार्गिकेशी जोडली जाणार
मेट्रो मार्गिका सहा महत्वाच्या सर्व मेट्रो मार्गिकांशी जोडलेली असणार आहे. या मार्गिकेला मेट्रो 1 अ, मेट्रो 3, मेट्रो 4, आणि मेट्रो 7 शी जोडले जाणार आहे. या मार्गिकेवर 13 स्थानके असणार आहेत. तसेच या मार्गिकेची पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकाशी कनेक्टीविटी असणार आहे. या मेट्रो लाईनच्या खाली एकाच पिलरवर 2.58 किमीचा फ्लाय ओव्हर बांधण्यात येणार आहे. त्यामुळे वरुन मेट्रो आणि खालून वाहनांकरीता रस्ता बांधण्यात येणार आहे. हा नागपूरनंतर मुंबईत प्रथमच एकाच पिलरवर डबल फ्लाय ओव्हर बांधण्याचा प्रयोग होणार आहे.
मेट्रो सहासाठी डेपो बांधणार कुठे ?
मेट्रो – 6 मार्गिकेसाठी 6,7116 कोटी रूपयांचा खर्च येणार असून 2017 मध्ये या मार्गिकेला मंजूरी देण्यात आली होती. मात्र या मार्गिकेसाठी डेपो कुठे उभारायचा याचे त्रांगटे अजून सुटलेले नाही. आघाडी सरकारने पर्यावरण रक्षणासाठी आरे ऐवजी कांजूरमार्ग येथेच भूयारी मेट्रो तीनचे कारशेड बांधण्याचे निश्चित केले होते. भुयारी मेट्रो तीन आणि मेट्रो 4 , 6 आणि 14 अशा चार मेट्रोसाठी एकत्रित कांजूरमार्गच्या मिठागराच्या जागेवर कारशेड बांधण्याची आघाडी सरकारची योजना होती. केंद्र सरकारने कांजूरच्या जागेवर दावा करीत जमिन देण्यास नकार दिला. परंतू नवीन सरकार आल्यानंतर कुलाबा-बीकेसी ते सिप्झ या भूयारी मेट्रो तीनचे कारशेड पूर्वी प्रमाणेच आरे कॉलनीत शिफ्ट केले आहे. परंतू कांजूरच्या जमिनीवरच मेट्रो सहाचे कारशेड बांधण्यात येणार आहे का हे नव्या सरकारने अजूनही स्पष्ठ केलेले नाही.