मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : एखादं नेतृत्व उभं राहतं तेव्हा त्या मागे राजकीय विचारसरणी, जडणघडणीचा मोठा वाटा असतो. राजकीय नेतृत्वाच्या मागे त्या व्यक्तीची विचारसरणी, त्याचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोण महत्वाचा ठरतो. शाळा- कॉलेजमध्ये असताना झालेली वैचारिक बैठक तुमचं नेतृत्व अधिक प्रभावशाली बनवते. विद्यार्थ्यांचं नेतृत्व करण्यापासून एखाद्या राजकीय नेत्याचा प्रवास सुरु होतो. त्यातील काही लोक हे राजकारणाचा केंद्र बिंदू होतात. असंच एक नेतृत्व म्हणजे अशोक चव्हाण विद्यार्थी प्रतिनिधी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, असा त्यांचा प्रवास राहिला आहे.
अशोक चव्हाण यांच्या घरातच काँग्रेसचा विचार होता. अशोक चव्हाण हे राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. चव्हाण कुटुंब आणि काँग्रेसचं जवळचं नातं आहे. शंकरराव चव्हाण यांच्यानंतर मराठवाड्यात काँग्रेसचा विस्तार करण्यात अशोक चव्हाण यांचा मोठा वाटा राहिला. तरूणपणात काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी अशोक चव्हाण यांनी मेहनत घेतली. लोकांशी विशेषत: तरूणांशी त्यांनी संपर्क वाढवला. यातूनच राजकीय नेता म्हणून अशोक चव्हाण यांचं नेतृत्व उभं राहिलं.
पुणे विद्यापीठात शिकत असताना अशोक चव्हाण हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी बनले. तेव्हा अशोक चव्हाण यांच्यातील नेतृत्व गुणाचा अधिक विकास झाला. या काळात तरूणांना एकत्र करण्यात अशोक चव्हाण यांना यश आलं. 1995 ते 1999 या काळात त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये महत्वाची जबाबदारी स्विकारली. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी आपला राजकीय कारकीर्द सुरू केला. पुढे 2014 ते 2019 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं. ऑगस्ट 2023 ते आजपर्यंत अशोक चव्हाण हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य होते. आज त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
1987-1989 या काळात अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते जिंकूनही आले. 1992 मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. 1993 साली सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृह राज्यमंत्री म्हणून ते सरकारमध्ये सहभागी झाले. 2003 मध्ये विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे वाहतूक, बंदरे, सांस्कृतिक कार्य आणि प्रोटोकॉल मंत्रिपदाची जबाबदारी होती. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं.