मुंबई : झोपडपट्टी सारख्या परिसरात राहूनही तुम्ही मोठी स्वप्नं पाहू शकता. केवळ स्वप्न न पाहता ती पूर्ण देखील करू शकता.. याचं जितं जागतं उदाहरण म्हणून धारावीच्या 14 वर्षीय मलीशा खारवा ( Maleesha Kharwa ) हिच्याकडे पाहीलं जात आहे. मुंबईतील धारावीच्या बजबजपूरीत राहूनही मलीशा हीची ब्युटी ब्रॅंड ‘फॉरेस्ट एसेंशियल्स’चे नवे कॅंपेन ‘द युवती कलेक्शन’चा नवा चेहरा म्हणून निवड झाली आहे. मलीशा हीला ‘स्लम प्रिन्सेस’ असे म्हटले जात असून तिच्याकडे हॉलीवूडच्या अनेक ऑफरही आहेत.
मलीशा हीने अनेक मॉडेलिंगची कामे केली आहेत. तिने ‘लिव्ह युवर फेयरीटेल’ या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. आता तिला फॉरेस्ट एसेंशियल्सच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टीत राहणाऱ्या मलीशा खारवा हीची निवड हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमन याने साल 2020 रोजी केली होती. ते एका गाण्याच्या शूटिंगसाठी मुंबईत आल्यावर मलिशाचा शोध लागला. तिने दोन हॉलीवूडचे सिनेमे देखील साईन केले आहेत.
मलीशा खारवा हीचे इंस्टाग्रामवर 2,25000 फॉलोवर्स आहेत, तिला अनेक मॉडेलिंग असाईनमेंट केल्या आहेत. मलीशा जेव्हा केवळ पाच वर्षांची होती तेव्हा तिने अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीच्या बरोबर फॅशन शोमध्ये रॅम्पवर आपली पावले थिरकवली होती. तेव्हाच तिने मॉडेलिंगमध्ये काहीतरी करून दाखवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू जिथे पोटभर दोनवेळचं जेवण मिळणं दुरापास्त अशा हालाखीच्या परिस्थितीत तिने पाहीलेलं स्वप्न अखेर तिच्या जिद्दीने सत्यात उतरलं आहे. आज मलीशा सोशल मिडीया इन्फ्लुअरच नाही तर तिच्याकडे दोन हॉलीवूडच्या ऑफर आहेत. तिला ‘स्लम प्रिंसेस’ असे म्हटले जात आहे.
फॉरेस्ट एसेंशियल्सने इंस्टाग्रामवरील व्हिडीओमध्ये मलीशा त्यांच्या स्टोअरमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. तिचा चेहऱ्यावरचा आनंद केवळ अवर्णीय असा आहे. या मुलीचा चेहरा तिची स्वप्ने सत्यात येताना पाहून आनंदाने उजळला आहे, या व्हिडिओला चार लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. मलीशाला यशस्वी होताना पाहून अतिशय आनंद झाला, तिला शुभेच्छा आणि भविष्यात आणखी यश मिळो अशा शुभेच्छा तिला मिळाल्या आहे.