मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ‘लोकमत’ सोहळ्यामध्ये मुलाखत झाली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे खासदार अमोल कोल्हे आणि प्रसिद्ध गायिका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या दोघांनी मुलाखत घेतली. राज ठाकरेंनी बाबरी मस्जिद, भोंगे, मनसे पक्षाची स्थापना, हिंदुत्त्वाची भूमिका घेणं आणि सिनेमागृह यावर दिलखुलासपणे आपली मतं मांडलीत. मुलाखतीच्या शेवटला त्यांना रॅपिड फायरमध्ये अमोल कोल्हे यांनी ठाकरे यांचे आवडते नेते कोण? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार की पंतप्रधान नरेंद्र मोदी? यावर राज ठाकरे पाहा नेमकं काय म्हणाले.
तसं फार कोणी नाही, कारण मी ज्यांना आजपर्यंत मानत आलो ते बाळासाहेब ठाकरे आहेत. मी आवडण्यापेक्षा दोघांच्या कामाची तुलना करू शकेल. दोघांमध्ये पाहिलं तर कामाला वाघ आहेत. राजकीय मतभेद, भूमिका आवडणं, न पटन हे स्वाभाविक असून याच्यासाठी आपण व्यक्तीवरती फुल्या मारत नाही. ज्यावेळेला मी नरेंद्र मोदींवर टीका करत होतो, ती त्या व्यक्तीवरची नाहीतर त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरची होती. तेच पवारांवर टीका करताना त्या व्यक्तिच्या भूमिकेवरती टीका करत असतो. मी कोणत्याही व्यक्तीवर टीका करताना त्यामध्ये मी माझं 100 टक्के टाकलेलं असतं, असं राज ठाकरे म्हणाले.
मी नाशिकला काम करून दाखवलं, निवडणुकीमध्ये यश नाही आलं हा भाग सोडा. माझा जन्म मुंबईमध्ये झाला वाढलो मुंबईमध्ये पण माझं खरंच प्रेम हे महाराष्ट्रावर आहे. विनाकारण सांगत नाही पण माझी ती श्रद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपली ओळख आहे, त्या महाराष्ट्राबद्दल आपण अभिमान बाळगणं, प्रेम असतं दुसरं काय असू शकतं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. मी राजकारणामध्ये अपघाताने आलोय. माझं पहिलं पॅशन हे फिल्म मेकिंग असल्याचंही ठाकरेंनी सांगितलं.