महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 आता अगदी हातातोंडाशी आली आहे. विधानसभेसाठी महाविकास आघाडीने अगोदरच मोर्चबांधणी सुरू केली आहे. लोकसभेतील काही उणीवांचा धडा घेत आता महाराष्ट्रातील विधानसभेचा गड राखण्यासाठी सामंजस्य दाखवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी त्यांनी भेटीगाठी घेतल्या. या दौऱ्यात इंडिया आघाडीतील मोठा भाऊ काँग्रेससोबत अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा पण ठरल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे.
विधानसभेचा रोडमॅप तयार
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक झाली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी त्यात एक रोडमॅप तयार करण्यात आला. यामध्ये विधानसभेच्या जागा वाटपापासून ते मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यापर्यंत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री पदी कोण असावे याविषयी तीनही घटक पक्षात एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जागा वाटपावर चर्चा
विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर महाविकास आघाडीतील घटक पक्षात साधक-बाधक चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस राज्यात सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना उद्धव ठाकरे गट तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जागा लढवणार असल्याची माहिती न्यूज18 ने दिली आहे.
राज्यात विधानसभेच्या 288 जागा आहेत. लोकसभा निवडणुकीत 48 जागांपैकी 14 जागा (एका अपक्षासह) काँग्रेसकडे आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे 9 आणि शरद पवार गटाकडे 8 जागा आहेत. तर महायुतीत भाजपकडे 9, शिवसेना शिंदे गटाकडे 7 आणि एनसीपी अजित पवार गटाकडे 1 जागा आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वांनाच चकवा दिला. लोकसभेत त्यांनी दणदणीत यश मिळवले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी वेगळी योजना आखल्याचे समोर येत आहे. मागील चूका टाळून महायुतीला पुन्हा दे धक्का देण्याच्या तयारीत महाविकास आघाडी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिला दिल्ली दौरा होता. त्यात त्यांनी अनेक नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्या.