मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. परंतु, कोश्यारी किंवा त्रिवेदी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. राज्यपाल ठरवून बोलत असल्याचं सुप्रिया सुळे यांचं म्हणणंय. राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यावरून राज्यभरात संतापाची लाट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना जुन्या काळातील आदर्श म्हटल्यामुळं राज्यपालांनी माफी मागावी, यासाठी राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. राष्ट्रवादीनं आझाद मैदान ते राजभवनावर मोर्चा काढला. पण, पोलिसांनी आझाद मैदान परिसरातच मोर्चा रोखला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
राज्यपालांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहचविण्याचं काम केलंय, असं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले. राज्यपालांनी त्वरित हटविण्याची मागणी करण्यात आली.
पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनात चक्क डुप्लिकेट राज्यपाल आणले. आंदोलकांनी डुप्लिकेट राज्यपालांचं धोतर फाडलं.
कोश्यारी किंवा भाजप यांच्याकडून अद्याप दिलगिरी व्यक्त केली गेली नाही. एखादी चूक झाल्यानंतर माफी मागितली गेली पाहिजे. परंतु, अद्याप माफी मागितली नसल्यानं राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
वाद दाखविणारे आदर्श मानायचे की, वाट लावणारे आदर्श मानायचे हा मोठा प्रश्न असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. नितीन गडकरी हे भाजपला आदर्श वाटत असतील तर मोदींच्या काळात गडकरी यांना अडगळीत टाकायचा प्रयत्न का झाला, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यावेळी पाच वेळी औरंगजेबाला पत्र लिहिलं, असं सुधांशू त्रिवेदी म्हणाले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली.