मुंबई : गणेशोत्सवाच्या (Ganpati Festival) पार्श्वभूमीवरती मुंबईतल्या (Mumbai) बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा चायनीज झेंडूची (Marigold floor) कृत्रिम फुलं पाहायला मिळत आहेत. ही कृत्रिम फुलं बाजारात आल्यामुळे नैसर्गिक फुलांच्या खरेदी वरती त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेली फुलं ही दरांमध्ये कमी असूनसुद्धा त्यांच्या खरेदीकडे ग्राहकांनी काहीशा प्रमाणामध्ये पाठ फिरवल्याचं फुल विक्रेते म्हणतायत. शिवाय ग्राहक प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांना पसंती देतायत. त्यामुळे त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावरती होत असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणंय. दादरच्या बाजारपेठेमध्ये विकली जाणारी चायनीज कृत्रिम झेंडूच्या एक किलो फुलांची किंमत 600 ते 700 रुपये प्रति किलो असल्याचं कृत्रिम फुलांचे विक्रेते सांगतात. मात्र दुसरीकडे नैसर्गिक झेंडूच्या फुलाची किंमत प्रति किलो साठ रुपये असून सुद्धा ग्राहक मोठ्या प्रमाणामध्ये ते खरेदी करत नसल्याचं नैसर्गिक झेंडू फुलांचे विक्रेते सांगतात. त्याचा फटका एकूण विक्रेत्यांसह शेतकऱ्यांनाही बसत असल्याचं पाहायला मिळतंय.
‘टीव्ही 9 मराठी’ने चायनीज कृत्रिम झेंडूच्या फुलांचा आणि नैसर्गिक झेंडूच्या फुलांचा आढावा घेतला. दोन्ही फुलांमधली किमतीची तफावत आणि ग्राहकांचा कल नेमका काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दादरच्या बाजारपेठेमध्ये कृत्रिम झेंडूच्या फुलांची किंमत ही जवळपास 600 रुपये प्रति किलो असल्याचा पाहायला मिळालं. ही फुलं मुख्यतः डेकोरेशन आणि इतर कामकाजासाठी वापरले जातात. त्यामुळे या फुलांची मागणी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलीय.
दुसरीकडे दादरच्या फुल मार्केटमध्ये नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या झेंडूच्या फुलांची किंमत प्रति किलो 60 ते 70 रुपये असल्याचा पाहायला मिळालं. विक्रेत्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही आपली कैफियत टीव्ही 9 मराठीसमोर मांडली. झेंडूंच्या फुलांचे विक्रेते म्हणतात की,
प्लास्टिकची फुलं खरेदी केल्यामुळे ती दीर्घकाळ टिकतात आणि त्यामुळेच लोक काहीशा प्रमाणामध्ये नैसर्गिक फुलं खरेदी करत नाहीत. मात्र त्यामुळे आमच्या व्यवसायावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतोय. दरवर्षी सणासुदीच्या महिन्यांमध्ये प्रति महिना जवळपास 50 कोटीहून अधिकची उलाढाल दादरच्या फुल मार्केटमध्ये पाहायला मिळते. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही यंदा आठ ते दहा कोटी रुपयांचा फटका बसलाय.