मुंबई : शिवसेना बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. 40 अधिक 10 असे 50 आमदार सोबत असल्याचा दाव एकनाथ शिंदे यांनी एकीकडे केला आहे. तर भाजपाच्या खेळीने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) घायाळ झाली आहे. बंडखोर आमदारांचे निलंबन 11 जुलैपर्यंत महाविकास आघाडीला करता येणार नाही. याचाच फायदा भाजपाने घेतला आहे. आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी विनंती केली होती, राज्यपालांनीही ती मान्य केली. याविरोधात शिवसेना (Shivsena) कोर्टात गेली आहे. त्याचा निर्णय यायचा बाकी आहे. या सर्वांमध्ये विश्वासदर्शक ठरावाची मागणी देवेंद्र फडणवीस यांनीच का केली, बंडखोरांनी का नाही, याच्या शक्यताही पाहाव्या लागतील.
राज्यपालांनी सांगितल्याप्रमाणे, उद्या विश्वासदर्शक ठराव असणार आहे. महाविकास आघाडीला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या सर्वांमागे असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीच ही मागणी का केली, याविषयीच्या काही शक्यता पाहू या…
शिवसेनेच्या बंडखोर 39 आमदारांपैकी (एकनाथ शिंदे यांनी दावा केल्यानुसार) 16 आमदारांना शिवसेनेने नोटीस पाठवली. त्याला शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. आता त्यांचे निलंबन महाविकास आघाडी सरकारला विशेषत: शिवसेनेला 11 जुलैपर्यंत करता येणार नाही. नेमक्या याच संधीचा फायदा भाजपाने घेतला आहे. मात्र यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याच्या पार्श्वभूमीवर 11 जुलैपर्यंत विश्वासदर्शक ठराव घेतला जाऊ नये, यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्याचा फैसला कोर्टात होणार आहे.