कन्नड साखर कारखान्याचा वाद काय? रोहित पवार यांच्याशी कनेक्शन काय

| Updated on: Mar 08, 2024 | 5:38 PM

Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना अखेर ईडीने जप्त केला. लिलाव प्रक्रियेने हा कारखाना बारामती एग्रोने खरेदी केला होता. ईडीने याप्रकरणी जप्तीची कारवाई केली आहे. पण बारामती एग्रो, शिखर बँक, कन्नड सहकारी साखर कारखाना कायम चर्चेत आहे. काय आहे यांचे एकमेकांशी कनेक्शन?

कन्नड साखर कारखान्याचा वाद काय? रोहित पवार यांच्याशी कनेक्शन काय
Follow us on

मुंबई | 8 March 2024 : राज्यात गेल्या काही वर्षांपासून बारामती एग्रो, शिखर बँक घोटाळा, कन्नड सहकारी साखर कारखाना हे शब्द तुमच्या वारंवार कानावर येत असतील. आमदार रोहित पवार यांचे नाव पण या सर्व प्रकारात चर्चेत येत आहे. आता ईडीने बारामती एग्रोच्या ताब्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला. त्यामुळे हा वाद नेमका आहे तरी काय ? त्यांचे एकमेकांशी संबंध तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

वादाचे मुळ कारण काय

कन्नड सहकारी कारखाना अवसायनात निघाला. शिखर बँकेने त्याची लिलाव प्रक्रिया सुरु केली. हा कारखाना बारामती एग्रोने अवघ्या 50 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर लिलाव प्रक्रियेतील सहभागी कंपन्यांचे एकमेकांशी झालेले व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. बारामती एग्रोशिवाय या प्रक्रियेत हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या लिलावात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये हायटेक कंपनीने लिलावासाठी प्राथमिक 5 कोटी रुपये जमा केले ते, बारामती एग्रोने दिल्याचा आरोप आहे.

हे सुद्धा वाचा

ईडीचा दावा काय

शिखर बँक घोटाळा झाल्याचा आरोप पूर्वीपासून करण्यात येत आहे. याप्रकरणात ईडीने न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदीसाठी एका कंपनीला बारामती एग्रोने कॅश क्रेडिट खात्यातून 5 कोटी रुपये दिले आणि बोली प्रक्रियेत सहभागी होण्यास सांगितल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. पण बोली लावण्यात आलेली रक्कम ही बारामती एग्रोला खेळते भांडवल म्हणून कर्ज रुपाने दिल्याचा ईडीने म्हटले आहे. पण कर्ज रुपी रक्कम बारामती एग्रोने दुसऱ्या कारणासाठी वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला. शिखर बँकेच्या कथित 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची पण चर्चा यानिमित्ताने होत आहे. कारण कन्नड सहकारी साखर कारखान्याने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. 2012 मध्ये कारखान्याने बँकेकडून 50 कोटींचे कर्ज घेतले होते.

आमदार रोहित पवार हे बारामती एग्रोचे कार्यकारी व्यवस्थापक असल्याने त्यांना ईडीने काही महिन्यांपूर्वी समन्स बजावले होते. त्यावेळी पण मोठा गदारोळ उडाला होता. आता ईडीने कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.