राऊत आणि शिवसेना नेतृत्वावरही दबाव, पत्रकार परिषदेतून शिवसेना नेते गायब का? सर्वच भाजप नेत्यांचा एकच सवाल!

| Updated on: Feb 16, 2022 | 5:33 PM

भाजपच्या सर्व नेत्यांनी एकच सूत्र पकडत ठाकरे कुटुंबीय, शिवसेना नेतृत्व हे संजय राऊत यांच्या पाठिशी नाहीत, असा आरोप केला आहे. नारायण राणे यांनी तर आता संजय राऊत यांनी राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवायची सुपारी घेतली आहे, असा आरोप केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराचं स्पष्टीकरण शिवसेनेच्या इतर नेत्यांकडून कसं केलं जातं, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

राऊत आणि शिवसेना नेतृत्वावरही दबाव, पत्रकार परिषदेतून शिवसेना नेते गायब का? सर्वच भाजप नेत्यांचा एकच सवाल!
Follow us on

मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर एकच प्रश्न सर्वत्र चर्चिला जात आहे. शिवसेनेच्या वतीने राऊत यांनी ही पत्रकार परिषद घेतली असेल तर या वेळी इतर शिवसेना नेते गायब का होते? संजय राऊत यांच्या पाठिशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा शिवसेना नेतृत्व नाही का? असा सवाल विचारला जात आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या (Kirit Somayya) आणि आता नारायण राणेंनीदेखील तोच मुद्दा उचलून धरत संजय राऊत यांना टार्गेट केलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या पाठीशी शिवसेना नेते आहेत की नाही, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीचा दबाव वाढत चालला आहे. राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरही हा दबाव वाढत चालला आहे. आता राऊत वगळता शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राऊतचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर- राणे

संजय राऊत यांच्यावर टीका करताना भाजप नेते नारायण राणे म्हणाले, संजय राऊत हा शिवसेना वाढवण्यासाठी हे करत नाहीये. त्याचं सगळं लक्ष उद्धव ठाकरे साहेब जिथे बसले आहेत, त्या खुर्चीवर आहे. हा शिवसेनेचा नाही, कदाचित नाही तर संपूर्णच राष्ट्रवादीचा आहे. त्याला सुपारी मिळाली आहे. उद्धवजी जेव्हा पहिल्यांदा पवार साहेबांकडे गेले तेव्हा फक्त उद्धवजींसोबत संजय राऊत आणि आदित्यच होता. त्यामुळे तेव्हा त्याच्या मनात तेच होतं. ते नाही तर मी… तुला आज ओळखतो का मी?.. अशा शब्दात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

राऊतांचा एकपात्री प्रयोग- चंद्रकांत पाटील

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेना भवनात राऊतांचा एकपात्री प्रयोग झाला. राऊतांच्या पत्रकार परिषदेला कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते, तरी शिवसेना आमदार किंवा सरकारमधील नेते का उपस्थित नव्हते, असा खोचक सवाल त्यांनी केला. संजय राऊत हेच उद्धव ठाकरे यांना घेऊन डुबणार. अडीच वर्षांपूर्वी संजय राऊत यांनीच हुलीवर घातलं. पवारांच्या इशाऱ्यावर नाचणारे संजय राऊत शिवसेनेची वाट लावणार आहेत. शिवसेनेला खड्ड्यात घालणार आहेत. पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे नेते येत नव्हते, मोठ्या मुश्किलीनं माणसं जमवावी लागली, त्यामुळे संजय राऊत एकटे पडले आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

15 फेब्रुवारी रोजी संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपताच, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांचा बॉम्ब फुसका निघाला. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला ज्या पद्धतीने आमदार येणे अपेक्षित होते, तेवढे आले नाही. आमदार, खासदार, नेत्यांनी पाठ फिरवली. मुंबईत शिवसेनेची लाट असताना नाशिकवरून गाड्या काढून इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तोंडावर पडले, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

जोडे मारू कुणाला म्हणाले, मला की रश्मी ठाकरेंना- किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही नवी दिल्ली येथे 16 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत शिवसेनेत मतभेद असल्याचं म्हटलं. राऊत यांनी अलिबागमधील ज्या 19 बंगल्यांचा उल्लेख केला, त्याचा मालकी हक्क रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्याकडे असून त्याच याचा कर भरत आहेत. मात्र ठाकरे सरकारचा संजय राऊत यांना पाठींबा नाही. त्यामुळे त्यांनी हा विषय काढला असून आता याचे संपूर्ण पुरावे मी दाखवेन. मला जोडे मारू म्हणणाऱ्या संजय राऊतांना नेमके कुणाला जोडे मारू असं म्हणायचं होतं? मला की रश्मी ठाकरेंना? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.

एकूणच, भाजपच्या सर्व नेत्यांनी एकच सूत्र पकडत ठाकरे कुटुंबीय, शिवसेना नेतृत्व हे संजय राऊत यांच्या पाठिशी नाहीत, असा आरोप केला आहे. नारायण राणे यांनी तर आता संजय राऊत यांनी राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवायची सुपारी घेतली आहे, असा आरोप केला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराचं स्पष्टीकरण शिवसेनेच्या इतर नेत्यांकडून कसं केलं जातं, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

इतर बातम्या-

तुझं रक्त भेसळय, राऊतांच्या भाषेला राणेंचं त्याच भाषेत उत्तर, पातळी कुठपर्यंत घसरणार?

संभाजीराजे खरंच शाहू महाराजांचे वंशज ठरतात का? याचा विचार करायला हवा, विजय वडेट्टीवार असे का म्हणाले?