जळगावमध्ये पोलिसांवर दगडफेक का झाली, नेमकं काय आहे प्रकरण?

| Updated on: Jun 21, 2024 | 11:03 PM

जळगावच्या जामनेरमध्ये संतप्त जमावानं पोलीस स्टेशनवर दगडफेक केलीय. या दगडफेकीत 15 पोलीस जखमी झाले आहेत... जामनेरमध्ये एका चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. दरम्यान आरोपीला आम्हीच शिक्षा देणार असल्याचं म्हणत संतप्त जमावाकडून पोलीस स्टेशनवर दगडफेक करण्यात आली.

जळगावमध्ये पोलिसांवर दगडफेक का झाली, नेमकं काय आहे प्रकरण?
Follow us on

जळगावच्या जामनेरमधील एका हृदय पिळवून टाकणाऱ्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. 11 जून रोजी जामनेर तालुक्यात एका 6 वर्षीय चिमुकलीवर 35 वर्षीय नराधामानं अत्याचार करुन तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर 10 दिवस आरोपी हा पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी या नराधमाला अटक केलीय.

6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या करण्यात आली. जळगावच्या जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावातील ही घटना आहे. 6 वर्षाच्या चिमुकलीवर एका 35 वर्षीय नराधमानं अत्याचार करुन तीची हत्या केली. त्यानंतरनराधम पसार झाला. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली. बेपत्ता चिमुकलीचा शोध घेतल्यानंतर गावाजवळील एका केळीच्या शेतात मृतदेह आढळला.चिमुकलीवर अत्याचार करुन तीची हत्या केल्याचं तपासणीत समोर आलं

10 दिवसानंतर पोलिसांनी नराधमला अटक केली. यानंतर गावातील संतप्त जमावानं आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. आरोपीला आम्हीच शिक्षा देणार असल्याचं जमावानं म्हटलं. पोलिसांनी जमावाला समजवल्यानंतरही ते ऐकायला तयार नसल्यानं जमावानं जामनेर पोलीस स्टेशनवरचं दगडफेक केली. जमावानं केलेल्या दगडफेकीत 15 पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीला राजकीय संरक्षण असल्याच्या भावनेतून दगडफेक झाली असेल दावा एकनाथ खडसेंनी केला. मात्र, दगडफेक करणं चुकीचं असल्याचंही यावेळी एकनाथ खडसेंनी म्हटलंय. जळगावातील जामनेरमधील प्रकरणानं जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राही हादरलाय. त्यामुळे आरोपी नराधमावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येतेय.