मुंबई : राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे सपत्नीक जपान दौऱ्यावर गेले होते. अंगात सदरा, धोतर. डोक्यावर गांधी टोपी आणि पायात चपला अशा पेहरावात नरहरी झिरवळ जपानला गेले. त्यांची पत्नीही नऊवारी लुगडं, कपाळाला कुंकू, गळ्यात पोत आणि पायात वाहाना घालून जपानला गेल्या. झिरवळ दाम्पत्याचा हा अस्सल मराठमोळा पेहराव असलेला फोटो व्हायरल झाला. त्यामुळे या फोटोची एकच चर्चा झाली. झिरवळ राजकारणी आहेत. आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष असतानाही झिरवळ अशा पेहरावात गेल्याने त्यांचं कौतुक झालंच. पण ते अशा पेहरावात का गेले? अशी चर्चाही रंगली. या प्रश्नाचं उत्तर खुद्द झिरवळ यांनीच टीव्ही9 मराठीशी बोलताना उत्तर दिलं आहे.
विधीमंडळाची एक बैठक झाली. त्यात आपल्या पद्धतीने कपडे घालून जाण्याचं ठरलं. मी सांगितलं. मी बदलणार नाही. माझी टोपी टोपीच राहील. आहे तोच पेहराव राहील. माझी अडचण होणार असेल तर मी येणार नाही. पण मी बदलणार नाही. सर्वांनी हसतमुखांनी सांगितलं काही हरकत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने कपडे घालून या. कुणी बंधन घातलं नाही, असं नरहरी झिरवळ यांनी सांगितलं.
माझ्या पत्नीला सांगितलं. शिर्डी सोडून तुझ्या बरोबर लांबचा प्रवास केला नाही. सासूरवाडीला जायचो. पण सासूरवाडी 20 ते 25 किलोमीटरवर आहे. सासूरवाडीला जातानाही मी फोनवर बोलत राहायचो. ती शेजारी बसून राहायची. रेंज नसेल तिथे सासूरवाडी असायला हवी होती असं ती म्हणायची. कारण मी प्रवासभर फोनवर असायचो. त्यामुळे जपानला जाताना फोन शिवाय प्रवास करण्याची पहिली संधी मिळाली. आमच्यासोबत लेडीज आमदार होत्या. त्यांच्या मुलीही होत्या. त्या पत्नीला म्हणाल्या ड्रेस बदलायला हरकत नाही. तेव्हा पत्नी म्हणाली, नाही तेच कपडे घालणार. आम्ही जसे वाढलो तसंच जाऊ. लहानपणापासून आम्ही त्याच कपड्यात वाढलो आहोत, असं झिरवळ म्हणाले.
जपान दौऱ्याहून आल्यावर मी शरद पवार यांना भेटलो. ते म्हणाले, कपड्यांचं कसं काय? मी म्हटलं, साहेब हे होतं असंच गेलो होतो. दोन धोतरं होती. दोन दिवस धोतर घालून चांगलं फिरलो. साहेब म्हणाले, थंडी वगैरे. मी म्हटलं, साहेब थंडी होती ना. साहेब म्हणाले, मग थंडीचं स्वेटर? मी म्हटलं ही कायम भातात काम करते. भाताची मळणी करते. कापणी करते. हिला स्वेटरची काय गरज काय? नाशिकची थंडी गुलाबी थंडी आहे. तिथे ती स्वेटर वापरत नाही. इथे कशाला वापरू? असं पत्नी म्हणाली, असं झिरवळ यांनी सांगितलं.
मीही कधीच स्वेटर वापरत नाही. सर्व लेडीज म्हणायच्या, गाईड म्हणायचे… काही करा साहेब ताईंना स्वेटर घ्या. मी त्यांच्या आग्रहाने स्वेटर घेण्यासाठी दुकानात गेलो. दुकानदाराला किंमत विचारली. त्यांनी किंमत सांगितली 28 हजार. हिनं सांगितलं नको नको नको. एवढ्या पैशात आपल्या तिकडं अख्ख्या घराला स्वेटर घेऊन पैसे उरतील. त्यामुळे इथल्या 28 हजाराचं स्वेटर नको. आपल्या इथे 1200 रुपयात मिळतं. त्यामुळे स्वेटर घेतलं नाही. कोण म्हणायचे बुटं घ्यावे लागेल. पत्नी म्हणायची कशाला बुटं? माझे पाय एवढे उललेत थंडीने. आता बुटही घालून काय करायचं आहे? त्यामुळे बूटही घेतले नाही, असं त्यांनी सांगितलं. मला चार नातवंडं आहेत. त्यांच्यासाठी मात्र भरपूर खेळणी घेतली. तेवढ्यावरच समाधान. कार्यकर्त्यांना पाच पन्नास किचन घेतल्या. वस्तू स्टँडर्ड आहेत, पण किंमत फार. पैसाच नाही. त्यामुळे काही जास्त खरेदी केली नाही, असंही ते म्हणाले.