मुंबई : मुंबईच्या माहीम पूर्व येथील डायमंड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आई आणि तीन वर्षाच्या मुलीचा खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर त्यांचे मृतदेह जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र हा खून करणारा दुसरा कोणी नसून त्या महिलेचा पती आणि त्या चिमुरडीचे वडील यांनीच हा खून केल्याचे उघड झाले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. इलियास सय्यद असं आरोपीचं नाव आहे. माहीम पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला.
माहीम इथे इलियास सय्यद आपल्या दोन लहान मुली आणि पत्नी सोबत राहत होता. गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास त्यांच्या घरातून जळाल्याचा वास येत असल्याने, शेजारील लोकांनी त्या खोलीत राहणाऱ्या सय्यदला कळवले. त्याने येऊन दहाव्या मजल्यावरील आपले घर उघडले असता आतमध्ये तहसीन इलियास सय्यद (30), अलिया फातिमा सय्यद (3) या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि त्यांचा मृतदेह पेटवण्याचा प्रयत्न केला होता. या दोघींची गळा चिरून हत्या करण्यात आली होती आणि मृतदेह जाळण्यात आल्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी केली नसून तिच्याच नवऱ्यानं केली आहे. विशेष म्हणजे हत्या करण्यासाठी प्रेयसीची मदत घेण्यात आली असल्याचे उघड झाले आहे.
अटक आरोपी इलियासचे आफ्रिन बानोशी प्रेम संबंध होते आणि त्यामुळेच त्याचे घरी वारंवार भांडण होत असे, त्यामुळे इलियासने मैत्रीण आफ्रिन बानोसोबत कट रचून पत्नीचा आणि मुलीचा धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. खून करून इलियास निघून गेला आणि आफ्रिनला पाठवले. तिने घरात प्रवेश करीत हत्या केलेली दोघी मृत झाल्याचे खातरजमा करत पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तेहसीनच्या मोबाईल वरून इलियासला मेसेज पाठवला आम्ही दोघी हे जग सोडून जात आहोत आणि तिने दोन्ही मृतदेह तेल टाकून जाळले आणि पळ काढला. मात्र पोलिसांनी या प्रेमी जोडप्याला दोघांच्या खुनाच्या आरोपा खाली अटक केली असून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे.