मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता नवा इशारा दिला आहे. अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. सोमय्या यांच्या या इशाऱ्याने एकच खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. अजित पवारंना माझा प्रश्न आहे की जरंडेश्वरचा मालक कोण आहे? कीती हजारांचे घोटाळे केले? या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत मी पवारांना प्रश्न विचारत राहणार. आशा करतो की त्यांच्यात या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत असावी, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला.
बुधवारी मी पुण्यात जाणार आहे. यावेळी अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची आणखी एक पोलखोल करणार आहे. यांनी इतके घोटाळे केले आहेत, लूट माजवली. पवार शेतकरी दादा, शेतकरी दादा म्हणत असतात. पण रोहीत पवार, सुनेत्रा पवार यांच्या नावाने कारखाने आहेत. लुटतात ते, अशी टीकाही त्यांनी केली.
पवारांच्या निकटवर्तीयांवर चार दिवसांपासून रेड सुरू आहे. त्यामुळे आता हा घोटाळा पाच हजार कोटींपेक्षा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे यांना तुरुंगात जावच लागेल. कायद्याने होत असलेल्या कारवायांना सामोरे जावंच लागेल. त्यांनी लुटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल असं मविआला स्वप्नातही वाटलं नसेल. पण मोदींनी ते करून दाखवलं, असंही ते म्हणाले.
अजित पवार, हसन मुश्रीफ, किशोरी पेडणेकर आणि नवाब मलिक यांच्यावर मी आरोप केले. पण मी दिलेले पुरावे खोटे आहेत हे सांगण्याची एकाचीही हिंमत झाली नाही, असं सांगतानाच आता घोटाळा केलाय तर हिशोब द्यावाच लागेल, असंही त्यांनी सांगितलं.
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने काल छापा टाकला होता. विशेष म्हणजे कालपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली, त्याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला.
अजित पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने 7 ऑक्टोबरला धाडी टाकल्या. अजित पवारांसह त्यांच्या तीन बहिणींच्या कंपन्यांवरही आयकरने छापेमारी केली. आयकर विभागानं छापे टाकलेले सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. साखर कारखान्याच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरू असल्यचाचं समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स, अहमदनगरमधील आंबालिका शुगर्स , सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आणि पुष्पदनतेश्वर शुगर ,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. बारामती एमआयडीसीतील एका कंपनीसह काटेवाडीतील एका बड्या व्यक्तीवर हा छापा टाकण्यात आला आहे. कर्जत येथील अंबालिका साखर कारखान्यावर देखील आयकर विभागाचे सकाळी 6 वाजता छापे टाकल्याची माहिती आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 10 October 2021 https://t.co/wP02StmpDb #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 10, 2021
संबंधित बातम्या:
आधी चीन, नंतर लेबनॉन, आणि आता देश-महाराष्ट्र अंधारात बुडणार? विजेचं संकट कसं काय? वाचा सविस्तर
(Will expose another person who related with ajit pawar with evidence, says kirit somaiya)