राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फुटला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. प्रचाराचा धडाका सुरू आहे. यंदा राजकारणाची अभूतपूर्व खिचडी झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशाच खिचडीतून तयार झाली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप एकीकडे मनसेला सोबत घेण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याची चर्चा पण रंगली आहे. तर भाजप नेते पीयूष गोयल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आशावादी असल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाले पीयूष गोयल?
बिझनेस टुडे यांनी एका कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार का, असा सवाल विचारण्यात आला होता. भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरु असल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता, त्यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले. “मी स्पष्ट करतो की, पडद्यामागून कुठलीही चर्चा, संवाद, संपर्क करण्यात आलेला नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत अजून मजबुतीने उभे आहोत. त्या शिवसेना गटासोबत आमचा काही एक संबंध नाही.” अशी प्रतिक्रिया गोयल यांनी दिली.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजप यांचा मिळून एक मजबूत युती तयार झाली आहे. आमचे महायुतीचे सरकार राज्यात बहुमताने निवडून येईल आणि हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत विकसीत राष्ट्र करण्याच्या संकल्पात सहभागी आहे, यावर त्यांनी जोर दिला.
लोकसभेत कमी मतांनी पराभव
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूकीनंतर लागलीच होत आहेत. लोकसभेत विरोधी आघाडीने महायुतीला झटका दिला होता. त्यावर पीयूष गोयल म्हणाले की, विधानसभा निवडणुकीबाबत मी मोठा आशावादी आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही काही जागांवर अगदी कमी मतांनी हारलो. काही ठिकाणी महाविकास आघाडीने चांगले प्रदर्शन केले असले तरी विजयी आणि पराभव झालेल्या उमेदवारात मतांचा मोठा फरक नसल्याचे दिसून आले. 11 जागांवर तरी असेच चित्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.