मुंबई : पतीने धावत्या लोकलमधून ढकलल्यामुळे मुंबईत 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हार्बर रेल्वेवरील चेंबुर आणि गोवंडी स्थानकादरम्यान ही घटना घडली. विशेष म्हणजे लोकलमधून ढकलण्याआधी दोघं दरवाजात झोके घेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी महिलेने दिली. (Woman Dies after Husband throws her from Mumbai Local)
31 वर्षीय आरोपी पती आणि त्याची 26 वर्षीय पत्नी मुंबई मजुरीची कामं करत असत. मानखुर्द भागाचे ते रहिवासी होते. विशेष म्हणजे मयत महिलेचं आधी एक लग्न झालं होतं. पहिल्या पतीपासून तिला एक मुलगीही आहे. तर दोन महिन्यांपूर्वी ती आरोपीसोबत विवाहबंधनात अडकली होती.
दरवाजातील खांबाला धरुन झोके
सोमवारी दुपारी पती-पत्नी लोकलने प्रवास करत होते. त्यावेळी महिलेची पहिली मुलगीही त्यांच्यासोबत होती. लोकल डब्याच्या दरवाजात दोघं उभे होते, तर सात वर्षांची चिमुरडी मुलगी आतमध्ये बसली होती. दरवाजातील खांबाला धरुन ते झुलत होते.
चेंबुर आणि गोवंडी स्थानकादरम्यान महिला लोकलमधून बाहेर झुकली. त्याचवेळी पतीने तिला दरवाजाजवळ धरले आणि मग ढकलून दिले, त्यामुळे ती रेल्वे रुळांवर पडली, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
सहप्रवासी महिलेकडून पोलिसांना माहिती
गोवंडी स्थानकात लोकल थांबल्यानंतर त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलेने याविषयी पोलिसांना सांगितलं. या दाम्पत्याची सर्व कृत्य या महिलेने पाहिली होती. पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन घटनास्थळी नेले. त्या ठिकाणी महिला बेशुद्ध आणि जखमी अवस्थेत पडली होती.
पोलिसांनी तातडीने महिलेला रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले. महिलेच्या मुलीला पोलिसांनी तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या. घटनेच्या वेळी आरोपी नशेच्या अंमलाखाली होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
संबंधित बातम्या :
चिमुकलीला लघुशंका आल्याने लोकलमधून उतरणं जीवावर, बाप-लेकीला लोकलने उडवलं
मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू
(Woman Dies after Husband throws her from Mumbai Local)