मुंबई: भूज-दादर एक्स्प्रेसमध्ये 40 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. रेल्वे आज सकाळी दादर स्टेशनवर पोहोचल्यानंतर ही धक्कादायक घटना उघड झाली. महिला डब्यात घुसून ही हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनमध्ये महिलेची गळा चिरुन हत्या झाल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मृत्यू झालेल्या प्रवासी महिलेचं नाव दया चौधरी आहे. या हत्येप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
भूज-दादर एक्स्प्रेस जेव्हा दादर स्टेशनला पोहोचली तेव्हा ही घटना उघडकीस आली. स्टेशनवरील सफाई कर्मचाऱ्यांना तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात नग्नावस्थेत दिसला. त्यांनी तात्काळ दादर रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. दया चौधरी यांची हत्या गळा चिरुन करण्यात आल्याचं पोलिसांच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आलं. तसेच मृतदेहावर जखमाही आढळल्या. त्यामुळे या महिलेवर आधी बलात्कार करुन मग हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
सुरतमध्ये राहणाऱ्या शंकर चौधरी यांची पत्नी दया चौधरी या मुंबईत त्यांच्या बहिणीकडे येत होत्या. यामुळे शंकर चौधरी यांनी दया यांना शुक्रवारी सकाळी 8.21 वा सुरत स्टेशनवरुन भूज दादर एक्स्प्रेसच्या महिला कोचमध्ये बसवले. मात्र दया यांचा हा प्रवास दोघा पती पत्नींच्या जीवन प्रवासातील अखेरचा प्रवास ठरला.
गाडीत सुरक्षारक्षक नव्हता. जर होता तर दया यांचा जीव कसा गेला? असा तीव्र संताप महिलेच्या पतीनं आणि नातेवाईकांनी केला.
दया यांची निर्घृण हत्या का आणि कोणी केली, याचा तपास पोलीस करत आहेत.