मुंबई : लग्नासाठी आग्रह धरल्याने प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची घटना मुंबईच्या नालासोपाऱ्यात घडली. प्रेयसी लग्नासाठी त्रास देत असल्याने प्रियकराने तिची हत्या केली, इतकंच नाही तर हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. मात्र एका कागदाच्या तुकड्यामुळे हा हत्येचा कट उघडकीस आला. यातील प्रियकर हा विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. तर, प्रेयसी ही देखील विवाहित होती, तिला तीन मुलं आहेत. मात्र ती तिच्या नवऱ्याला सोडून दुसऱ्यासोबत राहात होती, तर तिसऱ्याशी तिचे प्रेमसंबंध होते. या तिसऱ्या प्रियकराकडे तिने लग्नासाठी तगादा लावला होता. याला कंटाळून प्रियकराने तिची हत्या केली.
16 जानेवारीला काशीमीरा पोलिसांना घोडबंदरच्या जंगलात अर्धनग्न जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. हा जळालेला मृतदेह कुणाचा असेल याबाबत कुठलाही पुरावा पोलिसांना मृतदेहाजवळ आढळला नाही. त्यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी यासंबंधात तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी पुन्हा एकदा घटनास्थळाचा तपास केला, तेव्हा त्यांना तिथे एक कागद आढळून आला. या कागदावर एक मोबाईल नंबर लिहिलेला होता. पोलिसांनी या नंबरवर कॉल करुन चौकशी केली, तेव्हा तो मृतदेह हा नालासोपाऱ्यात राहणाऱ्या निर्मला सचिन यादव यांचा असल्याचं समोर आलं.
त्यानंतर पोलिसांनी निर्मलाची हत्या कुणी आणि का केली, याचा तपास सुरु केला. निर्मला ही तिच्या पतीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत नालासोपाऱ्यात आपल्या तीन मुलांसोबत राहायची. तर नालासोपाऱ्यातील राहणाऱ्या अबरार मोहम्मद अस्लम शेख याच्याशीही तिचे अनैतिक संबंध होते. मागील एका वर्षापासून या दोघांमध्ये संबंध होते. निर्मलाने अनेक दिवसांपासून अबरार शेखकडे लग्नासाठी तगादा लावला होता. पण अबरार शेख हा आधीच विवाहित होता. त्याला दोन मुलंही होती. मात्र निर्मला ही वारंवार त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती. या सर्वांना कंटाळून अबरार शेखने निर्मलाच्या हत्येचा कट रचला.
15 जानेवारीला निर्मला पुण्याला जाण्यासाठी निघाली. त्यानंतर अबरार शेखने निर्मलाला लग्नाची बोलणी करायची आहे असे सांगत घोडबंदरच्या जंगलात नेले. तिथे त्याने दगडाने ठेचून तिची हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्धेष्याने त्याने निर्मलाला तिच्या सर्व सामानासोबत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र याच सामानातील त्या छोट्याश्या कागदाच्या तुकड्याने अबरार शेखचा गुन्हा समोर आणला.
पोलिसांनी अबरार शेखला अटक केले असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यावरुन अबरार शेखवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.