आनंद पांडे, प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देहू, आळंदी, पंढरपूर येथे दाखल होतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांची संख्यादेखील लक्षणीय असते. वेगवेगळ्या वयोगटातील तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामधून लाखो वारकरी महिला या पंढरीची वाट दरवर्षी चालत असतात. यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने महिला वारकऱ्यांसाठी आरोग्य वारी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.
यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. २०-२१ दिवस महिला जवळपास दोनशे किमीचा पायी प्रवास करत असतात. यामुळे वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत महिला आयोगाची आग्रही भूमिका आहे. यात वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय आणि न्हाणी घराची व्यवस्था असावी.
सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन असणे आवश्यक आहे. स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. महिला सुरक्षिततेकरिता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परिसरात दर्शनी भागात लावावेत. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करुन देण्यात यावा. पालखी सोहळ्याकरिता निर्भया पथक तैनात करण्यात यावे. अशी आयोगाची भूमिका आहे.
आरोग्य वारी उपक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेण्यात आली. यावेळी महिला आयोगाच्या सदस्या गौरी छाब्रिया, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, उपसचिव दीपा ठाकूर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी पुणे, अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका, निवासी उपजिल्हाधिकारी सातारा, उपायुक्त सातारा जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर, अतिरिक्त आयुक्त सोलापूर महापालिका आदी उपस्थित होते. सातारा, पुणे, सोलापूर या तीन ही जिल्ह्याच्या प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला.
पुणे जिल्हा प्रशासनाने महिला वारकऱ्यांसाठी १२९० फिरती स्वच्छतागृहे आणि १२ शाळांमधे न्हाणीघराची व्यवस्था केली आहे. डॉक्टरांच्या पथकात स्त्री रोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध आहे. ३० ठिकाणी निवारा कक्ष उभारण्यात आले आहेत. हिरकणी कक्ष, सॅनिटरी पॅड मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात अंगणवाड्यांमधे महिला वारकऱ्यांसाठी न्हाणीघर, स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. दुचाकीवर तैनात आरोग्य पथकाची सोय करण्यात आली आहे. पिवळ्या रंगाच्या या दुचाकी लगेच ओळखता येतील, अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. महिला निवारा कक्षात महिला नोडल अधिकारी, २१ ठिकाणी हिरकणी कक्ष सातारा जिल्हा प्रशासनाने तयार केले आहेत.
सोलापुरात दर दीड किमी वरच्या निवारा कक्षात निर्भया पथक गस्त घालणार आहे. ४० ठिकाणी हिरकणी कक्ष, २५ डॉक्टर पथक अशा सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.