मुंबईतील वांद्रे परिसरात दसऱ्याच्या दिवशी रात्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात ते गतप्राण झाले. लीलावती रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या गोळीबाराच्या घटनेने मुंबई हादरली. राजकीय क्षेत्रापासून ते बॉलिवूडला मोठा धक्का बसला. अनेक दिग्गजांनी तातडीने लीलावतीकडे धाव घेतली. वडिलांच्या घडाळ्याच्या दुकानात काम करण्यापासून ते आमदारकीपर्यंतचा त्यांचा असा होता प्रवास…
दिग्गजांची लीलावतीकडे धाव
बाबा सिद्दीकी यांचा राजकारणा इतकाच बॉलिवूडमध्ये प्रभाव होता. अनेक बड्या कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या ग्रँड इफ्तार पार्टीकडे सर्वांचे लक्ष असायचे. या पार्टीत झाडून सर्व बॉलिवूड हजर असायचे. अनेक वर्षांपासून ही पार्टी दरवर्षी न चुकता होते. त्यात सलमान खान, शाहरूख खान, संजय दत्तपासून बॉलिवूडमधील दिग्गज हजेरी लावतात. टीव्ही मालिकांमधील अनेक चेहरे या पार्टीत दिसतात. यंदा बाबांनी ही पार्टी मुंबईमधील ताज लँड्स अँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये दिली होती. त्यांच्यावर गोळीबार झाल्याची वार्ता पोहचताच राजकीय क्षेत्रातील बड्या नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलेब्रिटीपर्यंत अनेकांनी लीलावतीकडे धाव घेतली.
सुनील दत्त यांचा मोठा प्रभाव
बाबा सिद्दीकी राजकारणात येण्यापूर्वी अभिनेता सुनील दत्त यांच्या संपर्कात आले होते. त्यांच्या माध्यमातून त्यांचा बॉलिवूडशी संपर्क आला. तितकाच काँग्रेसशी पण संबंध आला. सिद्दीकी यांच्यावर सुनील दत्त यांचा मोठा प्रभाव होता. पुढे त्यांच्याच प्रेरणेने त्यांनी अनेक समाजकार्य सुरू केली. इफ्तार पार्टी हा त्याचाच भाग होता. त्यामाध्यमातून विविध क्षेत्रातील लोकांशी ते संपर्कात राहायचे.
घडाळ्याच्या दुकानापासून सुरूवात
मीडियातील वृत्तानुसार, राजकारणात पाऊल टाकण्यापूर्वी बाबा सिद्दीकी हे त्यांच्या वडीलांच्या, अब्दुल रहीम सिद्दीकी यांच्या घड्याळाच्या दुकानात त्यांना मदत करायचे. या दुकानात ते रमले होते. पण महाविद्यालयीन जीवनात त्यांचा सामाजिक कार्याशी संबंध आला. 1977 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मुंबईतील अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग होता. मुंबई महापालिकेत दोनदा नगरसेवक होते. तर 1999,2004 आणि 2009 असं तीनदा ते आमदार झाले.