मुंबई : सध्याच्या घडीला नोकरी मिळवणं फार कठीण होऊन बसलं आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी मिळवणं हे फार जोखमीचं काम होऊन बसलं आहे. कारण पोलीस भरती, अग्निशमन दलाची भरती, आरोग्य खात्यांच्या भरती, शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील सरळ सेवा भरती अशा वेगवेगळ्या भरतींसाठी लाखो तरुण अर्ज करतात. ते नियमानुसार परीक्षा देतात. या परीक्षांचे निकाल खूप अटीतटीचे लागतात. जवळपास सर्वांनाच चांगले गुण मिळतात. पण शेवटी मेरीटच्या हिशोबाने निर्णय घ्यावा लागतो. संबंधित विभागाची परीक्षा आयोजित करणारी यंत्रणा याबाबतचा निर्णय घेत असते. पण सरकारी नोकरीसाठी इतकी स्पर्धा सुरु असताना मुंबईत अग्निशमन दलाच्या भरतीत मोठा घोळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय.
मुंबई स्थित भायखळा फायर ब्रिगेड मुख्यालयाच्या परिसरात आज चांगलाच गोंधळ उडाला. अनेक तरुणांकडून गंभीर आरोप करण्यात आले. हा गोंधळ उडण्यामागील कारण म्हणजे फायर ब्रिगेडच्या भरतीसाठी नुकतीच पार पडलेली परीक्षा. या परीक्षेचा निकाल समोर आलाय. पण या निकालानंतर उमेदवारांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. आपल्याला जास्त गुण मिळूनही कमी गुण मिळवलेल्या तरुणाचं नाव निवड केलेल्या उमेदवारांच्या यादीत असल्याचा आरोप काही तरुणांनी केलाय. तर काहींनी या परीक्षेच्या निवड प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई स्थित भायखळा फायर ब्रिगेड मुख्यालयाच्या परिसरात आज उमेदवारांची गर्दी जमली. यात जमलेल्यांपैकी अनेकांनी अग्निशमन दलात भर्ती होण्यासाठी परिक्षा दिली होती. यावेळी अनेक उमेदवारांनी अग्निशमन दलाच्या भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करत गंभीर आरोप केले. एकाच उमेदवाराची चार वेळा निवड यादीत नावे दिसून येत आहेत, असा काहींचा आरोप आहे. तर काहींनी आपल्याला जास्त गुण मिळूनही आपल्या पेक्षा कमी गुण मिळालेल्यांची नावे यादीत आली आहे, असा आरोप केला. याशिवाय असे अनेक आरोप करण्यात आले.
यावेळी उमेदवारांनी चांगलाच गोंधळ घातला. अर्थात उमेदवारांचे आरोप खरे आहेत की खोटे आहेत? याबाबतची सविस्तर माहिती आगामी काळत समोर येईलच. पण ते आक्रमक होण्यामागील कारण महत्त्वाचं आहे. प्रत्येक उमेदवाराला आजच्या घडीला नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे. नोकरीसाठी तरुण वणवण फिरत आहेत. अनेक जण शेकडो किलोमीटर लांबून भरतीसाठी मुंबईत दाखल होतात. त्यामुळे या तरुणांची व्यथा समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. दरम्यान, तरुणांनी केलेल्या गंभीर आरोपांवर अग्निशन दलाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
या प्रकरणावर अग्निशमन दलाचे प्रमुख संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही याबाबत जी काही तक्रार आली आहे त्याची सखोल चौकशी करत आहोत. आम्ही उमेदवारांच्या प्रत्येक आरोपांची चौकशी करू. मात्र काहीच चुकीचं होणार नाही. कुणासोबतही अन्याय होणार नाही याची दखल आम्ही घेऊ”, असं आश्वासन अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी दिलं.