अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण : उधार घेतलेले पैसे व्याजासह दुप्पट करून परत कर, अन्यथा शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी केल्यानंतर तरुणीने नकार दिला. यानंतर तिला मारहाण करण्यात आल्याची घटना कल्याणजवळ घडली आहे. या प्रकरणी घाबरलेल्या पीडित तरुणीने पोलिसात तक्रार केली असून तक्रारीनुसार पोलिसांनी विकृत इसम रवी पाटील विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
पीडित मुलगी तीन बहिणी आणि आईसह राहते. आई घरकाम करते, तर वडील आजारी असतात. तिने काही महिन्यांपूर्वी घराचे भाडे देण्यासाठी परिसरात राहणाऱ्या रवी पाटील याच्याकडून 20 हजार रुपये व्याजाने घेतले. मंगळवारी पीडित मुलगी कामावरून आंबिवली येथील पाण्याची टाकी जवळून घराकडे परतत असताना त्या ठिकणी रवी पाटील मित्रांसह बोलत उभा होता.
रवी पाटीलने तरुणीला पाहताच तिला थांबवलं आणि व्याजाने घेतलेले पैसे दुप्पट करुन कधी देणार, अशी विचारणा केली. त्यावेळी पीडितेने सांगितलं, पैसे मी तुम्हाला दिले आहेत. आता कसले पैसे मागतो? पण रवी पाटीलने दुप्पट पैशांचा तगादा लावला.
दुप्पट पैसे देणार नसशील तर शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी रवी पाटीलने केली. घाबरलेल्या तरुणीने नकार देत तेथून पळ काढला आणि हा घडला प्रकार आपल्या ओळखीच्या काही जणांना सांगितला. यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली.