माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबरला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे भागातील कार्यालयाबाहेरच बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्यावर हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला. मात्र ही घटना घडली तेव्हा नेमकं काय घडलं? याबाबत बाबा सिद्दिकी यांचा मुलगा, आमदार झिशान सिद्दिकी यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे. बिश्नोई गँगचा या मागे हात आहे का? यावरही झिशान सिद्दिकी यांनी भाष्य केलं आहे.
जेवढी माहिती माध्यमात येत आहे. तेवढीच माहिती माझ्याकडेही आहे. मी आणि माझे वडील माझ्या ऑफिसमध्ये होतो. कामाबद्दल बोलत होतो. त्याच वेळी भूक लागली म्हणून तिथं जवळच एक उडुपी रेस्टॉरंट आहे. तिथे इडली खायला गेलो होतो. त्यानंतर दोन मिनिटांनी माझे वडील तिथून निघाले. मी त्यांच्याशी बोललो. दोन मिनिटांनी ते तिथून गेले आणि ही घटना घडली, असं झिशान सिद्दिकी यांनी सांगितलं.
आता निवडणूक होत आहे आणि अशा दिवसांमध्ये वडील माझ्यासोबत नाहीयेत. असं कुणाही सोबतही होऊ नये. दोन मिनिटांच्या आत एका कुटुंबाला तुम्ही निराधार करता. जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे. आम्ही अशी मागणी करतो की आम्हाला न्याय मिळावा, असं झिशान सिद्दिकी यांनी म्हटलंय.
नक्की काय घडलं, कुणी हत्या केली याबाबत मुंबई पोलीस तपास करत आहेत. माझे वडील हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच एक नरेटिव्ह सेट केला गेला. माझे वडील हॉस्पिटलला पण नव्हते पोहोचले. तोवर काही माध्यमांमध्ये बिश्नोई गँगचा संबंध असल्याच्या बातम्या आल्या. तसा नरेटिव्ह खूप लवकर तयार केला गेला. पण मी मुंबई पोलिसांना विनंती करतो की तुम्ही सगळे अँगल्स चेक करा. कुटुंबीय म्हणून आमच्या मनात ज्या काही शंका आहेत, जे काही संशय आहेत. ते आम्ही मुंबई पोलिसांसमोर ठेवले आहेत. पण विश्वास आहे की मुंबई पोलीस लवकरात लवकर कारवाई करेन, असं झिशान सिद्दिकी म्हणाले.