बीड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपले लक्ष महाराष्ट्रात केंद्रित केले आहे. राज्यात राव यांच्या बीआरएस पक्षाच्या एकापाठोपाठ एक सभा होत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्यांनी पंढरपूरमध्ये आपले संपूर्ण मंत्रिमंडळ आणून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, यावर पंकजा मुंडे मौन बाळगल्याने अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते. अखेर या चर्चेवर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणतेही शब्द मागे घेत नाही असे वक्तव्य त्यांनी केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
2020 मध्ये मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत मी हार आणि फेटा घालणार नाही असं जाहीर केलं होतं. ओबीसी राजकीय राजकारण टीकलं म्हणून समाजाने हार घालण्यास सुरूवात केली. मात्र, काल बीडमध्ये फेटा घाला म्हणून आग्रह केला. पण, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत फेटा घालणार नाही हा माझा पन आहे.
लोक म्हणतात मला फेटा शोभतो. मुंडे साहेबांना जसा शोभतो तसा तुम्हाला शोभतो. परळीमध्ये तीन महिने मराठा आरक्षणासंदर्भात ठिय्या आंदोलन झालं. त्या आंदोलनात सहभागी होते. कोणीही नेता तिथे फिरकला नाही. तिथं जाऊन भाषण केलं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले पाहिजे, ही माझी भूमिका होती आणि माझी भूमिका मी कधीही बदलणार नाही. ज्या दिवशी आरक्षण जाहीर होईल त्या दिवशी फेटा बांधेन असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
इतके वर्ष मला भाषणाची सवय आहे. निसर्गत: जे सुचतं ते बोलते. एकच भाषण अनेक वेळा करत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगळं भाषण करते. पक्षाने विविध कार्यक्रम प्रत्येकाला सोपविले आहेत. बीड जिल्ह्यात आमच्या सहा जागा होत्या. आता तीन जागा आमच्याकडे आहेत. आम्ही केलेलं काम वाजवून सांगा असं कार्यकर्त्यांना सांगितले आहे. म्हणून दूध पोळले आहे आता ताक फुंकून प्यावे लागेल असे त्यांनी सांगितले.
मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. स्वतःचं तिकीट मिळालं तर लढणं आणि प्रचार करणं हे माझं व्हिजन आहे. राज्याचे व्हिजन हे माझं दायित्व नाही. बीआरएसची ऑफर मी माध्यमातून पाहिली. पण, माझे विचार गुप्त आणि अंडरग्राउंड असतात, असे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.