नाशिकः नाशिक जिल्ह्यातील अतिशय चर्चित आणि प्रतिष्ठेच्या दिंडोरी नगरपंचायतीचा पूर्ण निकाल हाती आला असून, येथे केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना आपल्याच मतदार संघात जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी 17 पैकी 6 जागा मिळवून शिवसेना (Shiv Sena) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला ( BJP) केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस येथे एकत्र आले, तर सहजपणे महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते.
पवारांचा मतदारसंघ
डॉ. भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी दिंडोरी परिसरात अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भारती पवार यांचा दांडगा जनसंपर्क या भागात आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. तब्बल 8 वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही डॉ. भारती पवार यांनी लाखांच्या घरात मते मिळवली होती. नंतरच्या काळात राष्ट्रवादीत योग्य सन्मान न मिळाल्याने भारती पवार नाराज होत्या.
कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत
भारती पवार यांनी नाराजीतून 2019 साली भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेचा उमेदवार आयात केल्याने ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती मिळाली. याच जोरावर भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपचे पाठबळ मिळाल्याने भारती पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करत स्वत:चे स्थान आणखी भक्कम केले. मात्र, या निवडणुकीच्या निकालाने त्यांना धक्का बसला आहे.
अन् नगरपंचायत गेली…
दिंडोरी नगरपंचायतीची निवडणूक त्यामुळे डॉ. भारती पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्या मतदारसंघातही तळ ठोकून होत्या. येथे नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी सहा जागा शिवसेनेने पटकावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा पटकावल्या आहेत, तर भाजपला चार आणि काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीही एकत्र आले, तर नगरपंचायत त्यांच्या ताब्यात राहू शकते. विशेष म्हणजे मोदी लाटेत निवडून येणाऱ्या पवार यांना नगरपंचायत निवडणुकीत धक्का बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
असे आहे आजचे चित्र
– एकूण जागा – 17
– शिवसेना – 6
– राष्ट्रवादी – 5
– भाजप – 4
– काँग्रेस – 2
– इतर(अपक्ष) – 00
Nashik | लोकशाहीवरील अढळ निष्ठेसाठी विविध कार्यक्रम, जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व संस्थांना सूचना काय?