गजानन उमाटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 07 डिसेंबर 2023 : शिंदे सरकारच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. राज्याची उपराजधानी, संत्रानगरी नागपुरात हे अधिवेशन होत आहे. त्यामुळे पुढेचे 10 दिवस राज्याचं लक्ष नागपूरकडे असेल. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. या हिवाळी अधिवेशन गाजवणारे सात मुद्दे कोणते? वाचा…
1. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. अशात विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा गाजणार आहे. विरोधक मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
2. मराठा आरक्षणासोबतच धनगर आणि आदिवासी आरक्षणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अशात हा मुद्दा देखील या अधिनेशनात चर्चिला जाण्याची शक्यता आहे.
3. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. शेतकरी त्यामुळे चिंताग्रस्त आहे. यासाठी शेतकऱ्याला मदत मिळणं आवश्यक आहे, हा मुद्दाही चर्चेत येऊ शकतो. तसंच दुष्काळ, पाणी टंचाई हे मुद्देदेखील विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे.
5. ललित पाटील ड्रग्स प्रकरण मागच्या काही दिवसांपासून गाजतं आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांचाही या प्रकरणात हात असू शकतो, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशात विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे.
6. आरोग्य यंत्रणेतील भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्यापासून अनेकांनी राज्याच्या आरोग्यखात्यात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे यंदा होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
7. यंदाच्या अधिवेशनात विविध विधेयकं मांडली जाणार आहेत. या अधिवेशनात 9 विधेयकं मांडली जाणार आहेत. कोणती विधेयकं मांडली जाणार? हे पाहणं महत्वाचं असेल.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे काल संध्याकाळी सरकारकडून चहापानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे आजपासून सुरु होत असलेल्या या अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चिले जातात हे पाहणं महत्वाचं असेल.