नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर मोठा आरोप केला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा फोडला जाईल अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी यावेळेला केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबाव तंत्राचा वापर करून हे कारस्थान केलं जाईल अशी शंका उपस्थित केली आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून अजित पवार अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू असतांना विरोधी पक्षनेते अजित पवार हे काही आमदारांना घेऊन भाजप सोबत जाणार अशा चर्चा सुरू असतांना संजय राऊत यांनी हा मोठा दावा केला आहे. त्यातच अमित शाह देखील मुंबई दौऱ्यावर येत असल्याने त्यावरून संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केले. त्यांनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन अजित पवार अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या.
खरंतर यापूर्वी ही काही तासांसाठी अजित पवार हे भाजप सोबत गेले होते. त्यामुळे त्यांच्या बाबत पुन्हा चर्चा सुरू असतांना संजय राऊत यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे. संजय राऊत यांनी भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडण्याच्या तयारीत असल्याचे म्हंटले आहे.
यापूर्वी संजय राऊत यांनी अजित पवार जर भाजप सोबत गेले तर त्यांचा मिंधे होईल असे म्हंटले आहे. त्यामुळे संजय राऊत वारंवार अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपसोबत जाईल या अनुषंगाने भाष्य करत आहे. आता नागपूर दौऱ्यावर असतांना राऊत यांनी मोठा संशय व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून पुन्हा टीका केली आहे. अमित शाह हे महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पाहण्यासाठी महाराष्ट्रात येत असल्याचे म्हंटले आहे. तर दुसरीकडे त्यांनी ही सभा पाहिलीच पाहिजे असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे.
संजय राऊत यांनी याच दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्लाबोल करत असतांना संजय राऊत यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीवरच भाष्य केल्याने शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फुटणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतांना त्या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.