‘देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब…’, फोन खणाणला, नागपूर पोलिस हादरले, काय घडलं?

| Updated on: Mar 28, 2023 | 6:23 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचं प्रकरण ताजं असतानाच नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये काल आणखी एकदा फोन खणाणला. फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची माहिती फोनवरून देण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब..., फोन खणाणला, नागपूर पोलिस हादरले, काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सुनिल ढगे, नागपूर : महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या घराबाहेर काल रात्री एक थरार नाट्य घडलं.नागपूर पोलिसांच्या (Nagpur police) कंट्रोल रुमचा फोन रात्री दोन वाजता खणाणला. देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. रात्रीतून नागपूर पोलिसांच्या बॉम्ब पथकाने फडणवीस यांच्या घराची झाडाझडती सुरु केली. तपासानंतर तिथं कोणताही बॉम्ब आढळून आला नाही. तो फेक कॉल असल्याचं निष्पन्न झालं. अखेर नागपूर पोलिसांनी हा खोटी माहिती देणारा कॉल कुणी केला, याचा तपास केला आणि सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं.

बॉम्ब ठेवल्याचा तो कॉल…

नागपूर कंट्रोल रुमाल फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली. तेव्हा आपण तणावाखाली होतो. कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी असा कॉल केल्याचं सदर व्यक्तीने सांगितलं. नागपूर पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

रात्रभर बॉम्बची शोधाशोध

फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन येताच नागपूर पोलीस अलर्ट झाले. फडणवीस यांच्या घराबाहेर तत्काळ बॉम्बशोधक पथकाला पाठवण्यात आलं. तपास मोहीम वेगानं राबवली गेली. सलग तासभर शोधाशोध झाली. पण कुठेही बॉम्ब अथवा स्फोटकं आढळून आली नाहीत. त्यामुळे कुणीतरी हा फेक कॉल केला असावा, असा संशय पोलिसांना आला.

धमकीचं कारण मजेशीर

नागपूर पोलिसांनी सदर कॉल करणाऱ्या व्यक्तीलाही तत्काळ हेरलं. त्याची चौकशी झाली. या चौकशीत त्याने हा प्रकार करण्यामागचं कारण सांगितलं. ते ऐकून पोलीसही चक्रावले. घरातला वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे राग आल्याने फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब असल्याचा फोन केल्याचं सदर व्यक्तीने सांगितलं. या प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेरील सुरक्षा आणखी वाढवण्यात आलेली नाही. पूर्वप्रमाणेच सुरक्षारक्षत तेथे तैनात आहेत. मात्र एका फोनमुळे नागपूर पोलिसांमध्ये अक्षरशः खळबळ माजली होती.

गडकरींना धमकी देणारा आज नागपुरात दाखल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा, गडकरींच्या कार्यालयात फोन करुन खंडणी मागणारा आरोपी जयेश पुजाराला नागपूर पोलीसांनी ताब्यात घेतलंय. बेळगाव तुरुंगात फाशीचा कैदी असलेल्या जयेश पुजाराने गडकरींच्या कार्यालयात दोन वेळा फोन करत, खंडणी मागीतली होती. याच प्रकरणात बेळगाव तुरुंगातून ताबा घेत नागपूर पोलीसांनी जयेश पुजारा याला नागपुरात आणलंय…. आता गडकरींना धमकी देण्यामागे त्याचा काय उद्देश होता? याबाबत जयेश पुजाराची नागपूर पोलीस कसून चौकशी करतायत.