अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुष्पा-2’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे एकच धूम दिसून येत आहे. याच पुष्पा सिनेमामुळे एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यात नागपूर पोलिसांना यश मिळालं आहे. विशाल मेश्राम असं या कुख्यात गुन्हेगाराचं नाव असून, हत्या, ड्रग्स तस्करी आणि मारहाण यासारखे 27 गंभीर गुन्हे त्याच्यावर आहेत.
विशाल मेश्राम गेल्या 10 महिन्यांपासून फरार होता. सध्या अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घातल आहे. या चित्रपटाची भूरळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पडली आहे. दरम्यान हा सिनेमा पाहाण्यासाठी विशाल मेश्राम हादेखील येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विशाल ज्या सिनेमा हॉलमध्ये चित्रपट बघायला जाणार होता, त्याच टॉकीजमध्ये त्याच शोची पोलिसांनी देखील तिकीट काढली.
चित्रपट सुरू झाला, आरोपी विशाल टॉकीजमध्ये येऊन आपल्या खुर्चीवर बसला. यावेळी त्याच्यासोबत पाच ते सहा साथीदारही होते. विशाल मेश्राम टॉकीज मध्ये आल्याचा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून कम्फर्म केलं. त्यानंतर पोलिसही साध्या पोशाखात टॉकीजच्या आत विशाल बसलेल्या खुर्चीच्या मागे बसले.चित्रपट सुरू झाल्यावर काही वेळातच पोलिसांनी विशालच्या मुसक्या आवळल्या.
विशाल हा गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याच्याजवळ नेहमी शस्त्र असतं, सोबतच त्याने यापूर्वी पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर हल्ले देखील केलेले आहेत. त्यामुळे त्याला पकडताना पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. एवढेच नाही तर तो पळून जाऊ नये म्हणून पार्किंगमध्ये असलेल्या विशाल मेश्रामच्या कारच्या टायर मधील हवा देखील काढून टाकण्यात आली होती.
आरोपी विशाल मेश्राम वर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान पुष्पा-2 चित्रपट बॉक्स ऑफिस वर नवे किर्तीमान बनवत असताना याच चित्रपटाच्या आकर्षणामुळे एका कुख्यात गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश आल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. विशाल मेश्राम हा चित्रपट पाहण्यासाठी आला होता, त्याचवेळी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.