नागपुरात पोलिस अधिकाऱ्याकडून गर्भवती विन्नीचे डोहाळे जेवण

| Updated on: Jan 04, 2021 | 9:24 PM

नागपुरात एका पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने आपल्या लाडाच्या श्वानाचे मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला

नागपुरात पोलिस अधिकाऱ्याकडून गर्भवती विन्नीचे डोहाळे जेवण
Follow us on

नागपूर : नव्या पाहुण्याची चाहूल लागताच ‘कुणी तरी येणार येणार गं’ म्हणत डोहाळे जेवण केले जाते. मात्र, जर हेच डोहाळे जेवण एखाद्या श्वानाचे असेल तर.. नागपुरात एका पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबाने आपल्या लाडाच्या श्वानाचे मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला. (Nagpur Police Officer Celebrated baby Shower Dog)

एका पोलिस अधिकाऱ्याने चक्क घरी पाळलेल्या श्वानाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी शेजारी आणि नातेवाईकांना बोलावण्यात आले. विन्नीला सजवून पाळण्यात बसवले आणि केक कापून आनंदोत्सव साजरा केला. प्राण्यांप्रती प्रेम आणि आपुलकी व्यक्त केल्याबद्दल अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

अरूण बकाल हे नागपूर शहर पोलिस दलात आहेत. सध्या ते शांतीनगर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ‘ॲनिमल लव्हर’ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मित्राने गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी त्यांना लॅब्रा प्रजातीचे एक कुत्र्याचे पिल्लू गिफ्ट केले होते. त्यांनी त्याचे नाव ‘विन्नी’ ठेवले. महिन्याभरात विन्नी ही बकाल कुटुंबातील सदस्य बनली.

पोलिस अधिकारी बकाल यांची पत्नी आरती आणि मुलगा अनिष यांनी विन्नीला भरपूर प्रेम दिले. गेल्या दोन वर्षांपासून विन्नीचा मुलीप्रमाणेच वाढदिवस साजरा करण्यात येतो. गेल्या दीड महिण्यांपूर्वी विन्नीला डॉ. राऊत यांच्या दवाखाण्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी विन्नी प्रेग्नंट असल्याचे सांगितले. विन्नी आता ‘गुड न्यूज’ देणार म्हणून बकाल कुटुंबीयांनी तिची मुलीप्रमाणे काळजी घेतली.

विन्नीचे खाणे-पीणे तसेच वारंवार डॉक्टरांकडे नेण्यात येत होते. येत्या काही दिवसांतच तिची प्रसुती होणार आहे. त्यामुळे तिच्या डोहाळे जेवनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना त्यांना सूचली. विशेष म्हणजे, डोहाळ जेवण कार्यक्रमासाठी झोका, धनुष्यबाण, फुलांची सजावट आणि पारंपारिक गाणी लावण्यात आली होती. त्यासाठी वैष्णवी आणि स्नेहा यांनी सर्व सजावट केली.

एवढंच नव्हे तर, गर्भवती महिलेला डोहाळ जेवणाला ज्याप्रमाणे हिरवी साडी-चोळी घेतली जाते, त्याचप्रमाणे विन्नीलाही खास शिवलेला हिरवा ड्रेस घालून हेअरस्टाईल करून नटवण्यात आले होते. तर परिसरातील महिलांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी महिलांनी विन्नीचे औक्षण करून ओटीही भरली. सध्या या डोहाळजेवणाची नागपुरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. (Nagpur Police Officer Celebrated baby Shower Dog)

हे ही वाचा :

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी 2000 रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा भाव

ब्रिटनमधून आलेल्या 8 प्रवाशांना नव्या कोरोनाची लक्षणे, राजेश टोपेंच्या माहितीने धाकधूक