नवी दिल्ली : वंदे भारत एक्सप्रेस (Vande Baharat Express) भारताच्या रेल्वे नकाशावर झपाट्याने आगेकूच करत आहे. देशातील विविध राज्यांकडून वंदे भारत एक्सप्रेसची मागणी करण्यात येत आहे. अनेक राज्यात ही रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला उतरली आहे. वेगवान आणि आरामदायी प्रवासामुळे प्रवाशांच्या या रेल्वेवर उड्या पडल्या आहेत. सध्या ही रेल्वे 17 मार्गावर धावत आहे. 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली ते वाराणसी ही पहिली वंदे भारत रेल्वे धावली होती. वंदे भारत रेल्वेचा प्रवास अद्भूत आणि आलिशान आहे. वंदे भारत एक्सप्रेस पूर्वी नागपूर ते विलासपूर (Nagpur-Vilaspur) धावली होती. पण प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने डब्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. आता नागपूरकरांना पुन्हा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळेल.
आता या मार्गावर धावेल रेल्वे
वंदे भारत एक्सप्रेसचे नागपूरकरांना लवकरच गिफ्ट मिळणार आहे. आता सिंकदराबाद मार्गावर ही रेल्वे धावेल. नागपूर-सिकंदराबाद या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावेल. ही रेल्वे दक्षिण मध्य रेल्वे (South Central Railway-SCR) अंतर्गत ही रेल्वे धावणार. या रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ खूप वाचला. या दोन शहरात 581 किलोमीटरचे अंतर आहे.
इतके अंतर वाचेल
सिकंदराबाद ते नागपूर या शहरांना जोडण्यासाठी 10 तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेस या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे जवळपास 3 तास 30 मिनिटांचा वेळ वाचेल. अवघ्या 6 तासांत नागपूरला अथवा सिंकदराबादला जाता येईल. सध्या भारतात एकूण 17 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. आज 11 जून रोजी पटना-रांची वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी झाली. 15 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्ली ते वाराणसी ही पहिली वंदे भारत रेल्वे धावली होती.
या शहरांना जोडणार
सिंकदराबाद ते नागपूर या दोन शहरांना जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस अनेक जिल्ह्यांना जोडणार आहे. यामध्ये अदिलाबाद, करीमनगर, वारंगळ या शहरांसह महाराष्ट्रातील काही शहरांचा समावेश आहे. ही सुपर एक्सप्रेस काझीपेठ, रामगुन्दम, सिरपूर आणि इतर शहराच्या ठिकाणी ही रेल्वे थांबेल.
तिरुपतीचे घ्या दर्शन
सिंकदराबाद येथून सध्या दोन वंदे भारत रेल्वे सुटतात. सिंकदाराबाद-विशाखापट्टणम आणि सिंकदराबाद-तिरुपती या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. त्यामुळे नागपूरकरांना आता तिरुपतीचे दर्शन घेणे सोपं होईल.
पाटणा-रांचीचा प्रयोग
पाटणा-रांची या मार्गावर नुकतीच वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी झाली आहे. या मध्यम द्रुतगती रेल्वेने पाटणा ते रांची हा टप्पा नियोजीत वेळेत कापला. पाटणा रेल्वे स्टेशन येथून ही रेल्वे धावली. गया जंक्शन वरुन ही रेल्वे रांची येथे पोहचली. लवकरच ही रेल्वे नियोजीत वेळेत धावेल. त्यानंतर रेल्वेचा टाईमटेबल, भाडे याची माहिती जाहीर करण्यात येईल. एकदा मुहूर्त लागल्यावर बिहारमधील पहिली वंदे भारत रेल्वे धावेल.