औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातलं वातावरण पेटलेलं असून त्या मुद्यावरून सोमवारी नागपूरमध्ये दोन गटात हिंसक हाणामारी झाली. नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हे दोन्ही गट समोरासमोर आले. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. या हिंसाचारादरम्यान अनेक जण जखमी झाले, पोलिसांनाही दुखापत झाली. तेव्हापासूनच नागपूरमध्ये आणि राज्यभरातही तणावाचे वातावरण आहे. याच राड्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडल्याचेही उघड झाले आहे. नागपूरमध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील राड्यादरम्यान भालदारपूरमधील संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जमावाविरोधात गणेशपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूरात सोमवारी संध्याकाळी दगडफेक झाल्यानंतर तणावाचे वातावरण होते. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचवेळी शहरातील भालदारपुरा भागातील एका गल्लीतून पोलीस येत होते. त्यावेळी दंगा नियंत्रण पथकातील महिला पोलिस कर्मचाराही तेथे पोहोचल्या. त्यावेळी तेथए दगडफेक करणारे, जाळपोळ करणाऱ्यांना रोखण्याचा, त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता. तेव्हा तिथे बराच अंधार होता, आणि त्याच अंधाराचा फायदा घेऊन जमावातील काहींनी त्या गल्लीत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती समोर आली आहे. यामुळे संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी जमावाविरोधात गणेशपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घृणास्पद प्रकार करणारे आरोपी कोण याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.
राड्यातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा या आरोपींना कोर्टाने 21 पर्यंत पीसीआर दिला आहे. रात्री अडीच वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे. आतापर्यंत एकूण 46 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी 36 आरोपींना काल पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. सर्व आरोपींविरोधात गणेशपेठ आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र एटीएसकडूनही नागपूर हिंसाचाराचा समांतर तपास सुरू आहे.
दंगेखोरांना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा
दरम्यान या हिंसाचारप्रकरणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगेखोरांना सज्जड दम भरला. कुणी दंगा केला अथवा पोलिसांवर हल्ला केला तर तो कोणत्याही जाती, धर्माचा असला तरी त्याला सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्याला काही झाले तरी सोडणार नाही, कुणी दंगा करत असेल तर त्याच्यावर जात, धर्म न बघता कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.