औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादादरम्यान सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला. रात्रीच्या सुमारास हिंसक संघर्ष झाला होता. यावेळी दगडफेक, वाहनांची तोडफोड, जाळपोळ असे प्रकार घडले होते.यामुळे तणावाचे वातावरण होत, बरीच खळबळही माजली. या हिसांचारानंतर नागपूरमध्ये अनेक भागांत संचारबंदी लावण्यात आली असून अजूनही काही भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान हिंसाचाराच्या या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले होते. त्यांनी पोलीस आयुक्त, एसपी आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी संपूर्ण घटनेसंदर्भात पुन्हा माहिती दिली. कबर जाळत असताना कुराणचे आयत लिहिलेली चादर जाळली असा भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियातून अपप्रचार केला. सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी म्हणून पोस्ट केल्या त्यांना दंगेखोरांच्यासोबत सहआरोपी करणार आहे. त्यांनी दंगा भडकवला. 68 पोस्ट आयडेंटिफाय होऊन डीलिट झाल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली आहे. अजून काही पोस्टची माहिती घेतली जात आहे. ज्यांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवली त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर..
आतापर्यंत 104 लोकांना अटक केली आहे. त्यात 92 लोक आहेत आणि 12 लहान मुलं आहेत. जोपर्यंत शेवटच्या दंगेखोराला पकडलं जात नाही तोपर्यंत अटक सत्र सुरू राहील.कोणत्याही प्रकारे कुणाला दंगा करून दुसऱ्यांचं नुकसान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळेच दंगेखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करणार आहोत. जोपर्यंत दंगलखोरांना धडा शिकवत नाही, तोपर्यंत कारवाई सुरू राहील. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर कडक गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा देणार आहे,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
या घटनेचा तपास सुरू आहे. काही लोकांच्या पोस्टमध्ये त्या बांगलादेशी असल्याचं वाटतं. पण आज त्यात बांगलादेशी अँगल आहे की विदेशी हात आहे, असं सांगणं कठिण आहे. जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत असं म्हणता येणार नाही. मालेगावमध्ये मात्र हात असल्याचं स्पष्ट दिसत आहे, जे मालेगावचे पक्ष आहेत, ते मदत करत असल्याचं दिसत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यात आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करतो. जिथे बुलडोझर चालवायचं तिथे चालवू. कुणालाही सोडलं जाणार नाही. आता चौकशी होणार आहे. आमच्याकडे जेवढे कायदे आहेत. त्या कायद्यानुसार यात कारवाई करू, असे ते म्हणाले. या हिसांचारादरम्यान महिला पोलीसाचा विनयभंग करण्यात आल्याचे वृत्त समोर आलं होतं. मात्र असं काहीच घडलं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. महिला कॉन्स्टेबलसोबत अभद्र व्यवहार झाला नाही. मी सीपींना विचारलं. पण तसं काही झालेली नाही. पण महिला पोलिसांवर दगडफेक झाली आहे. महिला पोलीसांना घेरून दगडफेक झाली. त्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधानांचा दौरा होणार का ?
येत्या 30 मार्च रोजी पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा होणार आहे. नागपूर शहरातील अशांततेच्या वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरही मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्त्तर दिलं. पंतप्रधानांच्या दौऱ्याला काही परिणाम होणार नाही. जी घटना झाली ती एका भागात झाली. 60 के 70 टक्के नागपुरात काही घडलं नाही. लोकांचं जनजीवन सुरक्षित आहे. त्यामुळे तो दौरा नीट होणार. ज्या भागात तणाव होता त्यात शांतता आहे. पंतप्रधानांचा दौरा ज्या पद्धतीने ठरला आहे. त्या पद्धतीनेच होईल. दौरा ठरल्याप्रमाणेच होईल,असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.