गजानन उमाटे प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नागपूर | 06 डिसेंबर 2023 : शिंदे सरकारचं यंदाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार नागपुरात मुक्कामी आहे. संत्रानगरीत उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. सध्याच्या राज्यातील प्रश्नांना घेऊन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या काळात विविध आंदोलनं होणार आहेत. जवळपास 100 मोर्चे विधिमंडळात धडकणार असल्याची माहिती आहे. यातच्या 45 पेक्षा जास्त मोर्चांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सभागृहासह सभागृहाच्या बाहेरच्या आंदोलनांनी यंदाचं अधिवेशन गाजणार आहे.
उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे चर्चिले जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा यंदाच्या अधिवेशनात चर्चेत येऊ शकतो. मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही विरोधक लावून धरू शकतात. काही दिवसांआधी राज्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची भरपाई, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्याचं नागपुरात आगमन होईल. पाच वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चहानापाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सरकार वतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधक हजेरी लावणार? की विरोधक बहिष्कार घालणार हे पाहणं महत्वाचं असेल. आज संध्याकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत.
अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनिती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. विरोधकांच्या बैठकीत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या अधिवेशनासाठी कशी तयारी करण्यात आली आहे, याबाबत माहिती दिली. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात चोख पोलीस बंदोबस्त असेल. हिवाळी अधिवेशनात सुरक्षेसाठी तब्बल 11 हजार पोलीस तैनात असणार आहेत. व्हीआयपी सुरक्षा ही पोलीसांची प्राथमिकता असेल. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक देखील 24 तास तैनात असणार आहे, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.
नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अधिवेशनावर जवळपास 100 मोर्चे धडकणार आहेत. आतापर्यंत 45 पेक्षा जास्त मोर्च्यांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. मोर्चांवर वॅाच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही, ड्रोन, मोबाईल सर्व्हिलंस व्हॅन तैनात असणार आहे. अधिवेशन काळात पोलीसांचं जेवण, निवास आणि आरोग्याची उत्तम व्यवस्था असेल, असंही अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.